सानिया मिर्झाचा पूर्व पती शोएब मलिक चौथं लग्न करतोय का? सना जावेदशीही घटस्फोट, कोण आहे नवी बेगम?
Shoaib Malik: माजी पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा पूर्व पती शोएब मलिकच्या चौथ्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहेत. वयाच्या 44 व्या वर्षी शोएब चौथं लग्न करणार असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाचा पूर्व पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 44 वर्षांच्या शोएब मलिकचं मॉडेल-अभिनेत्री वनीजा सत्तारसोबत चौथं लग्न होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही रिपोर्ट्समध्ये तर 2 ऑक्टोबरलाच दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शोएब मलिक आणि वनीजा सत्तार यांच्या लग्नाची चर्चा पहिल्यांदाच होत नाही. याआधी फेब्रुवारी 2026 मध्येही दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी 27 फेब्रुवारीला दोघांचा निकाह झाल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला होता. लग्नाचे फोटो समोर आल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, नंतर या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा 2 ऑक्टोबरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावेळीही दोन्ही संबंधित व्यक्तींनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. फेब्रुवारीत चौथ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर शोएब मलिकने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याने या बातम्या खोट्या आणि बनावट असल्याचं सांगत, वनीजा सत्तारला आपण कधी प्रत्यक्ष भेटलोही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला होता. वनीजा सत्तारनेही एका टीव्ही शोमध्ये या चर्चांवर भाष्य केलं होतं. तिने शोएब मलिकला प्रत्यक्ष आयुष्यात कधी पाहिलं नसल्याचं सांगत या अफवा निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
View this post on Instagram
शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. दोघांना इझहान नावाचा मुलगा आहे. त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चा अनेकदा झाल्यानंतर 2023 मध्ये दोघं वेगळे झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत जानेवारी 2024 मध्ये लग्न केलं. आता सना जावेदसोबतच्या नात्याबाबतही सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. मात्र, शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या घटस्फोटाबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
कोण आहे वनीजा सत्तार?
वनीजा सत्तार ही पाकिस्तानमधील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचं नाव शोएब मलिकसोबत जोडलं गेल्यानंतर ती चर्चेत आली. मात्र, दोघांमध्ये लग्न किंवा नातं असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. शोएब मलिकच्या वैयक्तिक आयुष्याबाबत याआधीही अनेकदा सोशल मीडिया अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे यावेळीही अधिकृत घोषणा किंवा संबंधित व्यक्तींच्या वक्तव्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
