‘कॉमेडीच्या नावाखाली हे काय सहन..’; रणवीर अलाहबादियावर संतापली श्रेया बुगडे
युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त टिप्पणीची सध्या जोरदार चर्चा आहे. यावर आता 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेनंही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशा लोकांना आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो, खरंच?, असा उपरोधिक सवाल तिने केला.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने आईवडिलांवरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. या शोचा कर्ताधर्ता कॉमेडियन समय रैना आणि रणवीर या दोघांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. रणवीरच्या वक्तव्यावरून विविध स्तरांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी त्याला अनफॉलो करण्याचा सपाटाच लावला आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेचीही पोस्ट चर्चेत आली आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याप्रकरणी एक पोस्ट लिहिली आहे.
श्रेया बुगडेची पोस्ट-
‘कॉमेडीच्या नावाखाली हे काय सहन केलं जातंय? आणि हे सगळं फक्त व्ह्यूजसाठी केलं जातंय. हे सर्व कीव येणारं आणि लज्जास्पद आहे. आपणसुद्धा त्यांना इन्फ्लुएन्सर्स म्हणतोय? खरंच? दु:खद आहे हे’, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला आहे.




रणवीर अलाहबादियाने नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या एका भागात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तो परीक्षक म्हणून कार्यक्रमात उपस्थित होता. त्याच्यासह कंटेंट क्रिएटर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मखिजाही उपस्थित होते. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून टीका झाली आणि मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईतील दोन वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी सोमवारी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रणवीर आणि समय रैना दोघांनाही चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ‘अश्लील विधानामुळे महिलांचा अपमान करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, कलाकार आणि संबंधित इतरांवर गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी वकील राय यांनी तक्रारीत केली आहे.
दरम्यान ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा तीव्र निषेध केला आहे. त्याचप्रमाणे या शोवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. “रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये घृणास्पद आणि अपमानकारक वक्तव्ये केली आहेत. आपल्या समाजाच्या नैतिक रचनेला हा गंभीर धोका निर्माण करतो. अशा शोचं कधीच समर्थन करता येणार नाही. या शोशी संबंधित लोकांना भारतीय चित्रपट उद्योगाकडून कोणताही पाठिंबा मिळणार नाही”, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.