Shreya Ghoshal: वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलली श्रेया घोषाल; पतीबद्दल म्हणाली..
Shreya Ghoshal: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि पतीबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाली. पतीसोबतचं नातं कसं आहे, याविषयी तिने सांगितलं.

बॉलिवूड आणि भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल तिच्या खासगी आयुष्याबाबत फारशी चर्चा करत नाही. मात्र, नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तिने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. पती शिलादित्य मुखोपाध्यायसोबतचं नातं, घरातील जबाबदाऱ्या आणि तिच्या व्यस्त करिअरला मिळणारा पाठिंबा याबद्दल श्रेयाने अनेक गोष्टी सांगितल्या. ‘द मेल फेमिनिस्ट पॉडकास्ट’मध्ये बोलताना श्रेयाने पती शिलादित्यचं कौतुक केलं. आपल्या आयुष्यात असा जोडीदार मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते, असं तिने सांगितलं. शिलादित्य घरातील अनेक जबाबदाऱ्या स्वतःहून पार पाडतो. विशेष म्हणजे, केवळ पत्नी असल्यामुळे घरातील सगळी कामं श्रेयानेच करावीत, अशी त्याची अपेक्षा नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
शिलादित्यला स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय आहे. तो स्वतःची भांडी घासतो, किचन साफ करतो आणि घरातील इतर कामांमध्येही हातभार लावतो. श्रेया ही कामं करण्यासाठी पुढे आली तर कधी कधी तो नाराजही होतो, कारण त्याला स्वतःच ती कामं करायला आवडतं. त्यामुळे त्यांच्या संसारात घरकाम ही केवळ महिलेची जबाबदारी नसून दोघांनी मिळून निभावण्याची गोष्ट आहे, असं चित्र दिसतं. श्रेया घोषालच्या कामाचं वेळापत्रक अत्यंत व्यस्त असतं. रेकॉर्डिंग, कॉन्सर्ट आणि प्रवासामुळे तिला अनेकदा दीर्घकाळ घरापासून दूर राहावं लागतं. मात्र, तिच्या गैरहजेरीवर शिलादित्यने कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत, असं श्रेयाने सांगितलं.
View this post on Instagram
दोघंही दिवसभर काम करत असल्यामुळे घरातील जबाबदाऱ्याही परिस्थितीनुसार दोघं मिळून सांभाळतात. त्यांच्या नात्यात एकमेकांच्या करिअरचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर असल्याचं श्रेयाच्या वक्तव्यावरून दिसून येतं. श्रेया आणि शिलादित्य एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. जवळपास दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं. 2021 मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगा देवयानचं आगमन झालं. आजही दोघं त्यांच्या खासगी आयुष्याला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
श्रेया घोषालच्या या वक्तव्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या वैवाहिक नात्याची एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली आहे. एकमेकांच्या करिअरचा आदर, घरातील जबाबदाऱ्यांची समान वाटणी आणि विश्वास यामुळे त्यांचं नातं मजबूत असल्याचं तिच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
