Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट लिहित मराठी माणसांकडून शिवीगाळ होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर या पोस्टमध्ये तिने राज ठाकरेंनाही प्रश्न विचारला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’ या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आहे. मात्र गुरुवारी सोशल मीडियावर ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत तिला ऑनलाइन शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्सचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे यातील काही जण स्वत:ला मराठी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक असल्याचं सांगत असल्याचं श्वेताने नमूद केलं. श्वेताने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महिलांना सोशल मीडियावर अशा प्रकारे अपमानित करण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
श्वेता तिवारीची पोस्ट-
इन्स्टाग्राम स्टोरीवर श्वेताने लिहिलं, ‘आज मला एका अशा विषयावर बोलायचं आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे आणि दुर्दैवाने सोशल मीडियावर खूप सामान्य झाला आहे.. एखाद्या महिलेला शिवीगाळ करणं. कोणतीही महिला असो, तिचं वय काहीही असो, ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो.. कोणत्याही पार्श्वभूमीचा पुरुष सोशल मीडियावर येऊन एखाद्या महिलेला शिवी देऊ शकतो. मला ज्या गोष्टीचा सर्वाधिक धक्का बसतो, ती म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरणारे पुरुष हे अशिक्षित किंवा वाईट परिस्थितीतून आलेले असतीलच असं नाही. त्यापैकी अनेकजण सुशिक्षित असतात. वरकरणी ते प्रतिष्ठित कुटुंबातून आलेले दिसतात. त्यांच्या घरी पत्नी, आई, मुली आणि बहिणी असतात. तरीही दुसऱ्या महिलेबद्दल विचार करताना सर्वांत अपमानास्पद शब्द वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण वाटत नाही.’

मराठी माणसाकडून शिवागाळ
पुढे श्वेताने तिला अश्लील आणि अपमानास्पज मेसेज पाठवणाऱ्या युजर्सच्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘दुसऱ्या महिलेशी अशा पद्धतीने बोलल्यानंतर तुम्ही घरी जाऊन तुमच्या कुटुंबाचा सामना कसा करता? विशेष म्हणजे ही व्यक्ती राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक असल्याचंही दिसतंय. इथून हा विषय माझ्यासाठी खूप वैयक्तिक होतो. मी माझं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात घालवलं आहे. माझे वडील मुंबईत वाढले. लहानपणापासून मी ‘मराठी माणूस’ असण्याशी जोडलेला अभिमान आणि प्रतिष्ठा पाहिली आहे. मराठी संस्कृती महिलांचा, त्यांच्या सामर्थ्याचा आणि त्यांच्या सन्मानाचा आदर करते, असा माझा विश्वास होता. त्यामुळे जेव्हा स्वत:ला अभिमानाने मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या सोशल मीडिया डीएममध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करतात, तेव्हा मला खरंच प्रश्न पडतो की, मराठी माणूस असण्याचा अर्थ आता हाच झाला आहे का?’
राज ठाकरेंना सवाल
याच मुद्द्यावरून श्वेताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही थेट सवाल केला. ‘राज ठाकरे, जर असे लोक तुमचे समर्थक असतील, तर मला खरंच जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला त्यांचं हे वर्तन मान्य आहे का? कारण मराठी बोलणं, स्वत:ला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं एवढंच पुरेसं नाही. महिलांचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे’, असं तिने स्पष्ट केलं.
