
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. संगीत क्षेत्रातील कामगिरी सुरू ठेवणार असून केवळ चित्रपटांमध्ये यापुढे पार्श्वगायन करणार नसल्याचं अरिजीतने स्पष्ट केलं होतं. अनेकांनी त्याच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी मात्र अरिजीतच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनेही अरिजीतला पाठिंबा दिला आहे. यादरम्यान आणखी एका गायिकेनं त्याची पाठ थोपटवत बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका केली आहे. ही गायिका दुसरी-तिसरी नसून आपल्या बेधडक मतांसाठी आणि वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली सोना मोहपात्रा आहे.
अरिजीतसाठी सोनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्टच लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय, ‘पार्श्वगायनापासून दूर जाणं हे इंडस्ट्रीतून बाहेर पडण्यासारखं कमी आणि स्वातंत्र्य, लेखकत्व आणि शक्यता यांच्याकडे आगमन झाल्यासारखं अधिक वाटतंय. त्याने असं का केलं याचा अंदाज मी लावणार नाही. मला खात्री आहे की कारणं खूप वैयक्तिक आणि पूर्णपणे वैध असतील. निवड महत्त्वाचं आहे. त्याच्या आधी कोणीही या मार्गाची कल्पनाही केली नव्हती. मोकळी जागा निर्माण करण्यासाठी बाजूला होणं.. सर्वांत आधी स्वत:साठी, काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी, काहीतरी नव्याचा शोध घेण्यासाठी, त्याच्या स्वत:च्या अटींवर स्वत:ची गाणी गाण्यासाठी. अर्थात आणि त्याचा हेतू असो किंवा नसो, यामुळे नव्या गायकांसाठी जागा निश्चितच तयार झाली आहे. त्याचसोबत अशा गाण्यांसाठी ज्यांना कधीही गाण्याची परवानगी दिली जाणार नाही.’
या पोस्टमध्ये सोनाने पुढे इंडस्ट्रीविषयी लिहिलं, ‘प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, ही इंडस्ट्री शून्य-रिस्क फॉर्म्युलावर चालते. निर्माते एकाच आवाजाचा अतिवापर करतात, डेमो गायकांना पैसेच देत नाहीत, संधी देण्याच्या नावाखाली प्रस्थापिक गायकांनाही मानधन देणं टाळतात, दहा आवाजांवर प्रयोग करतात, या सर्व थकवणाऱ्या प्रक्रियेदरम्यान संगीत दिग्दर्शकाला मारून टाकतात आणि नंतर अरिजीतच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करतात. प्रत्येकजण शोषणाची ही साखळी जिवंत ठेवतो कारण हे सर्वांत सोपं आहे, योग्य म्हणून नाही. त्यामुळे अरिजीतची ही निवड धाडसी, उदार आणि सर्वोत्तम प्रकारे विघटनकारी आहे. यासाठी मी अरिजीतचं कौतुक करते. त्याने निवडलेला हा नवीन मार्ग आनंद, समाधान आणि कल्पकतेने परिपूर्ण असू दे.’
सोनाने तिच्या या पोस्टमध्ये अशा लोकांचीही शाळा घेतली आहे, ज्यांनी अरिजीतच्या या निर्णयानंतर शोकाकुल वातावरणाची निर्मिती केली आहे. लोकांच्या प्रतिक्रियांवर आश्चर्य व्यक्त करत तिने पुढे म्हटलंय, ‘ती व्यक्ती संगीत निर्मिती करत आहे, कुठे गायब होत नाहीये. आपण अधिक आवाज, अधिक कल्पकता यांची का भीती बाळगतोय? आपण दुकानातील फक्त एकाच आईस्क्रीमच्या फ्लेवरचा आनंद का घेतो? एखाद्या कलाकाराने भीतीऐवजी स्वातंत्र्य निवडल्याचं मी कौतुक करते. अशाच पद्धतीने एका नव्या पर्वाची सुरुवात होते.’