तो मुद्दा उपस्थित केल्याने सोनू निगमवर टी-सीरिज, झी म्युझिकने घातलेली बंदी; धक्कादायक खुलासा
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध गायक सोनू निगम त्याच्या करिअरमधील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. कॉपीराइट आणि रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती, असा खुलासा त्याने केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील सर्वात कठीण टप्प्याबद्दल खुलासा केला. गायकांच्या कॉपीराइट आणि रॉयल्टी हक्कांसाठी आवाज उठवल्यामुळे त्याच्या करिअरवर कसा नकारात्मक परिणाम झाला, हे त्याने उघडकीस आणलं. एका मोठ्या कारणासाठी आवाज उठवल्यामुळे टी-सीरिज, झी म्युझिक यांसारख्या आघाडीच्या म्युझिक कंपन्यांकडून मिळणारं काम गमवावं लागेल, याचा मी कधीच विचार केला नव्हता, असं तो म्हणाला.
कोमल नाहटा यांच्या ‘गेम चेंजर्स: द म्युझिक सीरिज’ या पॉडकास्टमध्ये सोनू निगम म्हणाला, “माझी वेळ आली होती, ती निघून गेली आणि आता ती पुन्हा परत आली आहे. हा सगळा वेळेचा खेळ आहे. जेव्हा मी माझ्या यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा लोकांनी मला खूप प्रेम दिलं. मी अल्बम रिलीज करत होतो, लोक त्यासाठी अक्षरश: वेडे व्हायचे. माझे पोस्टर्ससुद्धा विकले जायचे. मग मी कॉपीराइटचा मुद्दा उपस्थित केला. टी-सीरिजने माझ्यावर बंदी घातली. झी म्युझिकनेही माझ्यासोबत काम करणं थांबवलं. ते मला म्हणाले की, हा तर कार्यकर्ता बनला आहे. माझ्यावर बंदी घातली जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.”
“मला वाटलं होतं की हा प्रश्न सुटेल, पण परिस्थिती आणखीच बिघडत गेली. जेव्हा माझ्यासाठी संधींची दारं बंद होऊ लागली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जरी ते मला गाणी देणं थांबवू शकत असले तरी ते मला स्टेजवर परफॉर्म करण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत. आज परिस्थिती बदलली आहे. ज्या म्युझिक लेबल्सने माझ्यावर बंदी घातली, तेच आता गायकांना रॉयल्टी देत आहेत. आम्ही आता आपुलकीने भेटतो, एकत्र बसतो आणि जेवणही करतो. देवाने मला फक्त गाण्यासाठी बनवलं नाही. त्याने मला एक उद्देश दिला आहे. लता मंगेशकरजींनी जे सुरू केलं होतं, पण पूर्ण करू शकल्या नाहीत, ते पुढे चालू ठेवण्याचा उद्देश आहे. जणू काही देव मला म्हणत होता की, तू तुझ्या करिअरच्या शिखरावर असताना आव्हान स्वीकारशील. जर तू हे केलं नाहीस, तर इतर कोणामध्येही हे धाडस नसेल”, असं तो पुढे म्हणाला.
सोनू निगम गेल्या तीन दशकांपासून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये असंख्य हिट गाणी गायली आहेत. सोन सध्या त्याच्या आगामी ‘रिव्होल्यूशन’ या कॉन्सर्टच्या तयारीत व्यस्त आहे.