दररोज शेकडो लोक मदतीसाठी येतात, पण सोनू सूद गरजू व्यक्ती कसा ओळखतो? अभिनेत्याने उघड केलं गुपित
दररोज 200 ते 300 लोक मदतीला येतात. पण अभिनेता सोनू सूद कसं ओळखतो की कोणाला जास्त गरज आहे. कसं ओळखायचं? अभिनेत्याने सांगूनच टाकलं.

प्रत्येक संकटात धावून येणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद. सध्या तो त्याच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एनडीटीव्ही आणि डेटॉलच्या लोकप्रिय ‘बनेगा स्वस्थ इंडिया’ या अभियानाचा 13 वा सीझन नुकताच सुरू झाला. या अभियानाच्या लॉन्च इव्हेंटला अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने हजेरी लावली. यावेळी त्याने गरजू लोकांना मदत करण्याचा त्याचा अनुभव आणि एखाद्या व्यक्तीला मदत करायची की नाही, हा निर्णय तो कसा घेतो याबद्दल सांगितलं.
सोनू सूदने सांगितलं की, गेल्या काही वर्षांत त्याच्या अनुभवामुळे एखादं प्रकरण खरं आहे की नाही, हे ओळखण्याची त्याच्यात जणू ‘एक्स-रे मशीन’ तयार झाली आहे. त्याच्या घराबाहेर किंवा ऑफिससमोर दररोज जवळपास 200 ते 300 लोक मदतीसाठी येत असल्याचं त्याने सांगितलं. यामध्ये वैद्यकीय उपचारांपासून शिक्षणापर्यंत विविध प्रकारच्या मदतीची गरज असलेले लोक असतात.
देशभर तयार झालं मदतीचं नेटवर्क
कोरोना काळात सोनू सूदने मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती. याच काळात त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांचं आज स्वयंसेवकांच्या नेटवर्कमध्ये रूपांतर झालं आहे. देशातील विविध भागांमध्ये एखाद्याला उपचार किंवा शिक्षणासाठी मदत हवी असल्यास स्थानिक संपर्कांच्या माध्यमातून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
पूरामुळे एखाद्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालं असेल, तर केवळ तात्पुरती मदत न करता त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हैस आणि वासरू देण्यासारखी मदत केली जाते, असंही सोनूने उदाहरण देत सांगितलं.
पहाटे आलेल्या फोनवर तातडीने मदत
सोनूने नुकत्याच घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याला फोन आला होता. लखनऊमधील पीजीआय रुग्णालयाबाहेर एका मुलाला उपचारासाठी दाखल करून घेण्यात अडचण येत होती. सोनू सूदने डॉक्टरांशी संपर्क साधून मेसेज केला आणि सकाळी सव्वासहाच्या सुमारास त्या मुलाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू झाल्याचं त्याने सांगितलं.
‘मदत मागताना संकोच करू नका’, असा संदेशही सोनू सूदने यावेळी दिला. योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळी मदत पोहोचली, तर अनेक गोष्टी आपोआप जुळून येतात, असा त्याचा अनुभव आहे. तसेच त्याने मदतीबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, लोक मदत विसरले तरी मदत करण्याचा प्रयत्न थांबवू नये असं मत व्यक्त केलं.
