आधी बेटिंग अॅपमधून कमावले पैसे; आता ‘बिग बॉस’ फेम शेफाली बग्गाने ईडीकडे सोपवले 1.20 कोटी रुपये, नेमकं काय घडलं?
शेफाली बग्गा ही ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक असून सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तिच्या कथित प्रमोशनल व्यवहारांकडे तपास यंत्रणेचं लक्ष आहे.

Shefali Bagga: महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आता टीव्ही प्रेझेंटर आणि ‘बिग बॉस’ फेम शेफाली बग्गा चर्चेत आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान शेफाली बग्गाने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) तब्बल 1.20 कोटी रुपये जमा केले आहेत. महादेव बेटिंग सिंडिकेटच्या कथित प्रमोशनमधून मिळालेली उर्वरित रक्कम तिने तपास यंत्रणेकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शेफाली बग्गाला महादेव बेटिंग अॅपशी संबंधित प्रमोशनल कामांसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये मिळाल्याचा ईडीचा आरोप आहे. यापैकी मे महिन्यात तिच्या दिल्ली आणि मुंबईतील निवासस्थानांवर करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान 30 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित 1.20 कोटी रुपये तिने तपास यंत्रणेकडे जमा केले.
शेफालीने ही रक्कम दोन डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून सुपूर्द केली. यामध्ये 50 लाख आणि 70 लाख रुपयांच्या ड्राफ्टचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास ईडीचे रायपूर पथक करत आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि कथित बेकायदेशीर कमाईचा मागोवा घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शेफाली बग्गाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावर काही ब्रँड्सचे प्रमोशन करण्यापुरतीच तिची भूमिका मर्यादित होती. इतर सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्तींप्रमाणे तिनेही प्रमोशनल कामं केली; मात्र संबंधित अॅपच्या कथित बेकायदेशीर कारवायांची तिला माहिती नव्हती, असा दावा तिने केला आहे. तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केल्याचंही शेफालीने म्हटलं आहे. तिने संबंधित रक्कम जमा केली असून, कायद्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं तिने स्पष्ट केलं. या प्रकरणात ईडीने तिचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदवला असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तिच्यावरील आरोप आणि तिची भूमिका याबाबत तपासातील अधिकृत निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.
महादेव बेटिंग अॅप प्रकरण नेमकं काय आहे?
महादेव ऑनलाइन बुक या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन बेटिंग आणि विविध खेळांवर पैसे लावण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे या सिंडिकेटचे कथित प्रमुख सूत्रधार असल्याचं ईडीने म्हटलं आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. या सिंडिकेटमधून निर्माण झालेल्या कथित गुन्हेगारी उत्पन्नाचा आकडा तब्बल 75 ते 80 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. या प्रकरणात तपास यंत्रणेने अनेक आरोपपत्रे दाखल केली आहेत.
सेलिब्रिटीही तपासाच्या कक्षेत
महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचा तपास यापूर्वीही मनोरंजन क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कलाकार आणि काही क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी या प्लॅटफॉर्मचे कथित प्रमोशन केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. अभिनेता रणबीर कपूर यालाही 2023 मध्ये या प्रकरणाशी संबंधित प्रमोशनल कामाबाबत चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.
