लीप नव्हे तर चक्क 12 वर्षांचा फ्लॅशबॅक; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये मोठा ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका १२ वर्षांनी मागे जाऊन जानकी आणि ऋषिकेशच्या प्रेमकथेचा उलगडा करणार आहे. लीप न घेता Flashback मध्ये जाणारा हा मराठी टेलिव्हिजनमधील ऐतिहासिक प्रयोग प्रेक्षकांना नवा ट्विस्ट देणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनी ही नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन आणि हटके प्रयोग करत असते. आता स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून असाच एक ऐतिहासिक प्रयोग करण्यात येणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच, मालिकेचे कथानक लीप न घेता, थेट बारा वर्षांनी मागे Flashback मध्ये जाणार आहे. यामुळे प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
सध्या रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यात ‘ऐश्वर्या’ आणि ‘मास्कमॅन’ नावाचे वादळ आले आहे. आता प्रेक्षकांना जानकी आणि ऋषिकेश यांच्या नात्याची गोड आणि रंजक सुरुवात पाहायला मिळणार आहे. जानकी-ऋषिकेश यांची भेट नेमकी कशी झाली, पहिली भेट ते लग्न हा प्रवास कसा होता, तसेच या प्रवासातील चढ-उतार याची उत्कंठावर्धक आणि रंजक गोष्ट आता मालिकेतून समोर येणार आहे. तसेच १२ वर्षांपूर्वी जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाच्या गोष्टीत ‘मकरंद’ नावाचे एक वादळ होते. हा मकरंद नेमका कोण होता आणि त्याने त्यांच्या प्रेमात कोणते अडथळे आणले होते, तसेच त्याचे नेमके मनसुबे काय होते, यावरचा पडदा लवकरच उलगडणार आहे.
View this post on Instagram
सुमीत पुसावळे काय म्हणाला?
या अनोख्या वळणाबद्दल बोलताना ऋषिकेशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे म्हणाला, “या नव्या कथानकासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आजवर प्रेक्षकांनी शांत, संयमी आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारा ऋषिकेश पाहिला. पण १२ वर्षांपूर्वी ऋषिकेशचा स्वभाव खूप वेगळा होता, या भूमिकेला अनेक पैलू आहेत. जानकी-ऋषिकेश १२ वर्षांपूर्वी नेमके कसे होते हे साकारताना खूप धमाल येणार आहे. आमचे लूकपण खूप छान झाले आहेत, प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक नक्की आवडेल याची खात्री आहे.”
प्रेमाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट
कवयित्री विमल लिमये यांच्या ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ या कवितेतील ओळींचा अर्थ नव्याने पटवून देणारी ही मालिका आहे. घर म्हटलं तर छोट्या-मोठ्या कुरबुरी या आल्याच, पण घराला खऱ्या अर्थाने घरपण देणाऱ्या आपल्या माणसांची, त्यांच्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची ही गोष्ट आहे.
