सिनेमाच्या नावाखाली तमाशा, चोरीच्या सिनेमांना पुरस्कार…; फिल्मफेअरवर संतापला दिग्दर्शक
नुकतेच फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाली. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, यावर ‘द केरल स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी सिनेमाच्या नावाखाली तमाशा सुरु असल्याचे म्हटले आहे.

अहमदाबाद येथे नुकतेच फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात 2024चा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली. या चित्रपटाला 12 इतर ट्रॉफीही मिळाल्या. यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन यांची निवड झाली, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या सर्व घोषणांदरम्यान ‘द केरल स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पुरस्कारांवर जोरदार टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याला सिनेमाच्या नावाखाली तमाशा सुरु आहे असे म्हटले.
फिल्मफेअरवर सुदीप्तो सेन यांचा संताप
फिल्मफेअर पुरस्कारांबाबत सुदीप्तो सेन यांनी एक लांबलचक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटले की, यंदा चोरीच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. एक असा चित्रपट जो बॉक्स ऑफिसवर 72 तासही टिकला नाही, त्याला बहुतांश पुरस्कार देण्यात आले. आता समजले की, ‘द केरल स्टोरी’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर फिल्मफेअर इतके का अस्वस्थ झाले होते. मला आनंद आहे की, हा ‘वूड’ समुदाय आम्हाला ना ओळखतो, ना आम्हाला आमंत्रित करतो.
वाचा: साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!
View this post on Instagram
पुरस्कार सोहळ्याला म्हटले तमाशा
दिग्दर्शकाने पोस्टमध्ये पुढे म्हटले की, आम्ही स्वतःला अशा खोट्या हास्यापासून दूर ठेवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही कुणाचीही चापलूसी करत नाही. मला आनंद आहे की, मुंबईत सिनेमाच्या नावाखाली होणारा हा तमाशा आणि कान्समध्ये सेल्फी घेण्यापासून आम्ही वाचलो. किमान आम्ही सिनेमाच्या नावाखाली होणाऱ्या या घृणास्पद ढोंगापासून मुक्त आहोत.
सुदीप्तो सेन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, त्यांना आता भारतीय सिनेमा संस्थांकडून आणि विशेषतः माध्यमे आणि चित्रपट पत्रकारितेकडून कोणतीही मोठी अपेक्षा नाही. हे बहुतांश लोक फक्त ताऱ्यांच्या झगमटाकडे आणि त्यांच्या श्रीमंत जगाकडे आकर्षित होतात. जसे की गावांतील आणि छोट्या शहरांतील लोक अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान यांच्या घराबाहेर गर्दी करतात.
राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता
नुकतेच सुदीप्तो यांना त्यांच्या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचाही पुरस्कार जिंकला. मे 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘द केरल स्टोरी’मध्ये अदा शर्मा मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट केरशमधील काही महिलांच्या गटाची कथा आहे, ज्यांना जबरदस्तीने धर्मांतर करून ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले गेले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
