
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज (8 डिसेंबर) 90 वा जन्मदिन आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचं मुंबईतल्या जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना देण्यात आली नव्हती, किंवा त्यांची अंत्ययात्राही काढण्यात आली नव्हती. त्यामुळे सनी आणि बॉबी देओल या त्यांच्या दोन्ही मुलांवर अनेकांकडून टीका झाली. परंतु आता वडिलांच्या जन्मदिनी त्यांनी चाहत्यांसाठी जुहू इथल्या घराचे दरवाजे खुले केले आहेत. खुद्द सनी आणि बॉबी देओल चाहत्यांचं हात जोडून स्वागत करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. धर्मेंद्र यांच्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळतेय. धर्मेंद्र यांच्या 90 व्या जन्मदिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहते जुहूमध्ये पोहोचले आहेत.
धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यानंतर सनी – बॉबी देओल यांच्याकडून एक आणि हेमा मालिनी यांच्याकडून दुसऱ्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराबद्दल असंख्य चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा काढायला हवी होती, चाहत्यांना त्यांना अखेरचं पाहण्याची संधी मिळायला पाहिजे होती, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. अखेर आज त्यांच्या चाहत्यांसाठी जुहू इथल्या घराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.
धर्मेद्र यांच्या अंत्यविधीबद्दल अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस 19’च्या ग्रँड फिनालेमध्ये मत व्यक्त केलं होतं. “दोन जणांचा अंत्यविधी आणि शोकसभा अत्यंत व्यवस्थितप्रकारे पार पाडण्यात आलं होतं. एक दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आईच्या निधनानंतर आणि दुसरं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर. कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक सर्व नियोजन केलं होतं. अर्थात सर्वजण रडत होते, परंतु एक जो आदर आणि जी सभ्यता असायला हवी, आयुष्याचं सेलिब्रेशन जसं असायला हवं.. ते इथे होतं. यासाठी मी सनी, बॉबी आणि सर्व कुटुंबीयांना सलाम करतो. प्रत्येक अंत्यसंस्कार आणि शोकसभा अशाच पद्धतीने पार पडायला हवेत,” असं तो म्हणाला होता.