‘बॉर्डर 2’साठी बहिणी आठवल्या का? सनी देओलच्या त्या कृतीवर भडकले नेटकरी

रविवारी मुंबईत 'बॉर्डर 2'च्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला सनी देओलच्या दोन्ही सावत्र बहिणी उपस्थित होत्या. यावेळी सनीने दोघींसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉर्डर 2साठी बहिणी आठवल्या का? सनी देओलच्या त्या कृतीवर भडकले नेटकरी
सनी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 26, 2026 | 10:07 AM

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. अशातच रविवारी सनी देओल त्याच्या ईशा आणि अहाना देओल या दोन सावत्र बहिणींसोबत कॅमेरासमोर दिसला. भावाच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ईशा आणि अहाना पोहोचल्या होत्या. तिथेच सनी देओलने दोघींसोबत एकत्र फोटोसाठी पोझ दिला. वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच या तिघांना एकत्र पाहिलं गेलंय. त्यामुळे चाहत्यांसाठीही हा क्षण खूप खास होता.

स्क्रिनिंगला जाण्याआधी ईशा आणि अहाना हे भाऊ सनी देओलच्या बाजूला फोटोसाठी उभे राहिले. सनीनेही दोन्ही बहिणींच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसाठी पोझ दिले. धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं होतं. त्यानंतर सनी देओल आणि हेमा मालिनी यांनी वेगवेगळ्या शोकसभेचं आयोजन केलं होतं. याची चाहत्यांमध्येही चर्चा झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच या तिघांना एकत्र पाहिलं गेलंय. या स्क्रिनिंगनंतर संध्याकाळी सनी देओलने मुंबईच्या गेटी गॅलेक्सी थिएटरला भेट दिली होती. ‘बॉर्डर 2’ पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता. यावेळी सनीसोबत अभिनेता अहान शेट्टीसुद्धा उपस्थित होता. या दोघांनी चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक केले.

ईशा आणि अहानासोबत फोटोसाठी पोझ दिल्यानंतर या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. ‘धर्मेंद्र यांच्या निधनानंतर शोकसभेला बहिणींना का बोलावलं नाही’, असा सवाल एकाने केला. तर ‘फक्त चित्रपटासाठी नाही तर खरंच बहिणी म्हणून स्वीकार केला असता तर बरं वाटलं असतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

धर्मेंद्र हे प्रकाश कौर यांच्याशी विवाहित असताना हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या दोन्ही मुलांना म्हणजेच सनी आणि बॉबी देओलला वडिलांचं हे दुसरं लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे हेमा मालिनी आणि त्यांच्यात कायम दुरावा राहिला.

दरम्यान केंद्र सरकारने रविवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या असामान्य योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. धर्मेंद्र हे त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत चित्रपटसृष्टीत सक्रीय होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘इक्कीस’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.