
बॉलिवूडमधील अतिशय देखणा चेहरा, सुरेख हास्य… ‘ही-मॅन’ अशी ख्याती असली तरी आपल्या हसण्याने समोरच्याला आपलेसे करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmednra) . खरंतर आज त्यांचा वाढदिवस, पण जयंती म्हणावी लागत्ये. कारण अवघ्या 15 दिवसांपूर्वीच, 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज ते असते तर 90 वा वाढदिवस साजरा केला असता. त्यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला, पोकळी निर्माण झाली, त्यांच्या चाहत्यांच्या, कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू तर खळतच नाहीयेत. त्यांच्या आठवणी सदोदित सर्वांच्या मनात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व चाहते, सहकलाकार त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देत आहेत.
कुटुंबियांनीही त्यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. अभिनेत्री ईशा देओल, अभय देओल आणि आता धर्मेंद्र यांचा मोठा, लाडका लेक, सनी देओल (Sunny Deol) .. धर्मेंद्र यांच्या जाण्यानंतर सनी देओल पहिल्यांदाच व्यक्त झाला असून त्याने वाढदिवसानिमित्त धर्मेंद्र यांचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने त्याचा लाडक्या बाबांसाठी काही ओळीही लिहील्या आहेत. त्याची ही भावूक करणारी पोस्ट पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
माझे बाबा नेहमीच… सनीची पोस्ट काय ?
अभिनेता आणि धर्मेंद्र यांचा लाडका, मोठा मुलगा सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धर्मेंद्र यांचा एक सुंदर व्हिडोओ शेअर करत त्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीोमध्ये धर्मेंद्र आणि सनी देओल हे दोघेही उंच डोंगरमाथ्यावर बसून समोरचं विहंगम दृश्य पहात आहेत. भान हरपून समोरचं दृश्य पाहणाऱ्या धर्मेंद्र यांना सनीने कॅमेऱ्यात कॅप्चर केलंय, त्यांच्याशी बोलताना तो दिसला. तिथेही धर्मेंद्र यांचं कोणालाही खिळवून ठेवणार सुरेख हास्य दिसलं. त्यासोबत सनीने काही ओळीही लिहील्या आहेत. ‘आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. बाबा नेहमीच माझ्यासोबत आहेत, माझ्या अंत:करणात आहेत. लव्ह यू पापा, मिस यू’ अशा भावूक ओळी त्याने या व्हिडीओसोबत लिहील्या आहेत.
त्यावर लाखो लाईक्स, कमेंट्स आल्या असून अनेकांनी धर्मेंद्र यांची आठवण काढत त्यांना शुभेच्छा दिल्या.
ईशा देओलनेही लिहीली पोस्ट
आज सकाळी धर्मेंद्र -हेमा मालिनी यांची मोठी मुलगी, अभिनेत्री ईशा देओल हिनेही पोस्ट लिहीत धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. ईशाने अनेक जुने आणि सुंदर फोटो शेअर केले आणि एक खूप छान संदेश लिहिला. “ माझे प्रेमळ बाबा.. आमचे वचन, सर्वात मजबूत बंधन… प्रत्येक जन्मात, प्रत्येक जगात आणि त्यापलीकडे… आपण नेहमीच एकत्र आहोत पप्पा. स्वर्गात असो वा पृथ्वीवर, आपण एक आहोत. सध्या तरी, मी तुम्हाला माझ्या हृदयात कोमलतेने, खोलवर, खोलवर जपून ठेवलंय…संपूर्ण आयुष्य, तुम्ही माझ्या खोलवर हृदयात रहाल ” असं ईशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच धर्मेंद्र यांचा पुतण्या, अभिनेता अभय देओल यानेही काकांच्या आठवणींना उजाळा देत एक सुंदर फोटो, काही ओळी शेअर केल्या आहेत.