‘जीभ कापण्याची धमकी मिळतेय’; म्हणणाऱ्या वकिलांना SC म्हणालं ‘त्यांनासुद्धा रणवीरसारखंच..’
युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी रणवीरला त्याच्या अश्लील टिप्पणीबद्दल चांगलंच फटकारलं आहे. त्याचप्रमाणे त्याला पुढील शोज करण्यास मनाई केली आहे.

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी नव्याने एफआयआर दाखल करू शकत नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला त्याच्या अश्लील टिप्पणीबद्दल चांगलंच फटकारलं आहे. इतकंच नव्हे तर जेव्हा रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड हे त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोर्टाने त्यांना कठोर स्वरात विचारलं की ते रणवीरच्या भाषेचा बचाव करत आहेत का? जेव्हा वकिलांनी रणवीरला मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला तेव्हा कोर्टाने म्हटलं की, “धमकी देणाऱ्यांनाही रणवीरसारखंच चर्चेत राहण्याचा शौक असेल.”
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहबादियाविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.




View this post on Instagram
कोर्टाने रणवीरला फटकारत म्हटलं की ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोदरम्यान त्याने जी टिप्पणी केली, ती अत्यंत लज्जास्पद होती. रणवीरचं वक्तव्य हे आईवडील आणि बहिणींनाही लाज वाटणारी आहे. “तुम्ही तुमच्या आईवडिलांना अशा स्थितीत आणून उभं केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत कोर्टाने सुनावलं. त्यावर रणवीरच्या वकिलांनी त्याची बाजू मांडत सांगितलं की शोमधील काही सेकंदांची क्लिप कापून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. यावरून आणखी वाद वाढल्याचं त्यांनी म्हटलं. याच्याशी न्यायाधीश सहमत नव्हते. “तुम्ही अशा पद्धतीच्या भाषेचा बचाव करत आहात का”, असा प्रतिप्रश्न कोर्टाने वकिलांना केला.
रणवीर अलाहबादियाला त्याची जीभ कापण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार वकिलांनी न्यायाधीशांसमोर केली. तेव्हा न्यायाधीश म्हणाले, “जर रणवीर अशा गोष्टी बोलून स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात, तर अशा काही धमक्या देणाऱ्यांनाही रणवीरसारखंच चर्चेत येण्याची हौस असेल.” याप्रकरणी न्यायालयाने रणवीरला त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पुढील काही काळ त्याला कोणतेच शोज करता येणार नाहीत.