‘तारक मेहता..’ सोडून गेलेल्यांवर ‘अब्दुल’ची टीका; म्हणाला “तुमच्या नशिबात..”
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद संकलाने सोडून गेलेल्या कलाकारांवर टीका केली आहे. मालिका सोडून गेलेले कलाकार आज दुसरीकडे कुठेच दिसत नाहीत, असं तो म्हणाला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावर दीर्घकाळापासून सुरू आहे. यातील कलाकार लहानाची मोठी झाली आणि त्यादरम्यान काहींनी या मालिकेला रामरामसुद्धा केला. ही मालिका सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक असली तरी गेल्या काही वर्षांपासून ती विविध वादांमुळे सतत चर्चेत आहे. यामध्ये काम केलेल्या काही कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. कोणी गैरवर्तनाचा तर कोणी पैसे थकवल्याचा आरोप करत मालिकेतून काढता पाय घेतला. यात शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, प्राजक्ता शिसोडे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. आता यामध्ये अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद संकलाने पहिल्यांदाच या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद म्हणाला, “काम सोडल्यानंतर जर तुमच्या हाती काही काम नसेल तर तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करता. हे चुकीचं आहे. कोणावरही असे आरोप करू नये. तुमच्या नशिबात तेवढंच काम होतं आणि तुम्ही ते सोडून गेला होता. तुम्ही निघून जा असं तुम्हाला कोणी बोललं नव्हतं.” यावेळी त्याने निर्माते असित कुमार मोदी यांचं कौतुक केलं. “मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी खूप चांगले आहेत. निर्माते तर बरेच आहे, पण हे निर्माते म्हणून परफेक्ट आहेत. त्यांचं कमिटमेंटचं खास आहे. पगारपाणी अगदी वेळेत येतं. एक दिवस कधी वर-खाली झाल्याचं मला आठवत नाही. मी माझ्या करिअरमध्ये अशा ठिकाणीही काम केलंय, जिथे शो बंद व्हायचे आणि मला पैसे मागायला त्यांच्या ऑफिसच्या चकरा माराव्या लागायच्या. कलाकाराला वेळीच मानधन मिळणं गरजेचं असतं. यासाठी मला असित मोदी बेस्ट वाटतात. ते सर्वांची चौकशी करतात, मदत करतात”, असं त्याने पुढे सांगितलं.
View this post on Instagram
यावेळी शरदने मालिकेतून बाहेर पडलेल्या कलाकारांवर टीका केली. “जे लोक ही मालिका सोडून गेले, त्यांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलं. तुम्ही तुमच्या मर्जीने गेलात, यात असित कुमार मोदींचंही नुकसान झालं असेल. त्यांच्यात काय करार झाला असेल, हा त्यांच्यातला मुद्दा आहे. प्रेक्षक म्हणून मी असं म्हणेन की जे लोक मालिका सोडून गेले, ते आज कुठेच दिसत नाहीत. ‘तारक मेहता..’ नाही तर दुसरी मालिकासुद्धा करू शकत नाहीयेत. सर्वांचा आपला वैयक्तिक निर्णय असतो”, असं मत त्याने मांडलंय.
