आता डोक्यावरून पाणी..; दयाबेनबद्दल काय म्हणाले ‘तारक मेहता..’चे निर्माते?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी अभिनेत्री दिशा वकानीबद्दल खुलासा केला आहे. त्याचसोबत नव्या दयाबेनबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दिशाने मालिका सोडल्यानंतर मी खूप घाबरलो होतो, असंही ते म्हणाले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका असून गेल्या अनेक वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशाच एका लोकप्रिय भूमिकेनं काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली होती. ही भूमिका होती दयाबेनची. अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर ती परतलीच नाही. दिशाने जेव्हा मालिका सोडली, तेव्हा निर्माते असित कुमार मोदी यांनासुद्धा मोठा धक्का बसला होता. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी तिच्या जागी दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्रीला निवडलं नव्हतं. दिशा मालिकेत कधी परतणार, याची प्रतीक्षा प्रेक्षकांनाही आहे.
असित मोदी यांनी याआधीही सांगितलंय की ते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत. त्यांनी दिशा वकानीलाच मालिकेत पुन्हा आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. परंतु रक्षाबंधननिमित्त जेव्हा असित मोदींसोबत दिशाचे फोटो व्हायरल झाले, तेव्हा चाहत्यांना खूपच आनंद झाला होता. दिशा पुन्हा मालिकेत दयाबेनच्या रुपात दिसणार, अशी आशा अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. आता असित मोदी यांनी पुन्हा एकदा दिशाच्या परतण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मालिकेत दयाबेनला आणावंच लागेल, असं ते म्हणाले.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यांना दिशाच्या कमबॅकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “हा प्रश्न मला सतत विचारला जातो. मी याआधी कधीच हे सांगितलं नव्हतं, पण आता नक्कीच सांगेन. खरं सांगायचं झालं तर, 2017 मध्ये जेव्हा दिशाने मालिका सोडली, तेव्हा मीसुद्धा खूप घाबरलो होतो. जेठालालसोबत दयाबेन हीसुद्धा मालिकेतील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तिची स्टाइल, बोलण्याचा अंदाज संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे बऱ्याच काळापर्यंत मी तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा विचार करत नव्हतो. दिशा आणि माझ्यात कोणतेच मतभेद नाहीत. आमच्यातलं नातं खूप चांगलं आहे.”
“मलासुद्धा तिच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल. तिने परत यावं अशी मलाही आशा आहे. परंतु तिने तिच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा ती दुसऱ्यांदा आई झाली, तेव्हा मला समजलं होतं की तिचं मालिकेत परतणं आता सोपं नाही. आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात असतो आणि रक्षाबंधनला तिने मला राखीसुद्धा बांधली होती. मी 2022-23 पासून नव्या दयाबेनच्या शोधात आहे. आमच्या मालिकेनं नुकतीच 17 वर्षे पूर्ण केली आहेत. आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता मालिकेत नवी दयाबेन आणण्याची वेळ झाली आहे”, असं ते पुढे म्हणाले.
