अभिनेत्रीला चौथ्या स्टेजचा ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सर; कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय?
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चौथ्या स्टेजच्या ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली. हा कॅन्सर कशामुळे होतो, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपचार काय असतात, याबद्दल जाणून घ्या..

‘गुलाब गँग’, ‘जोरम’ यांसारक्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीला चौथ्या स्टेजच्या ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झालं आहे. आठ महिन्यांपूर्वी तिला याबद्दल समजलं होतं. नुकतंच तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना प्रकृतीविषयीची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर तनिष्ठाने भलीमोठी पोस्ट लिहित कॅन्सरबद्दल सांगितलं आहे. तिच्या या पोस्टनंतर ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो, याविषयीचे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडू लागले. ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मंदिप सिंह यांनी ‘इंडिया टीव्ही’शी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली. ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सर काय असतो, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय असतात, या प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत.
ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणजे काय?
डॉ. मंदिप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या स्टेजचं कॅन्सर म्हणजे तुमच्या शरीरातील तो विविध भागातही पसरला आहे. या स्टेजमध्ये मूळ स्थानापासून शरीरातील विविध भागात कॅन्सरचा फैलाव झालेला असतो. त्यालाच ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सर असंही म्हणतात. याचा मुख्य अर्थ म्हणजे मेटास्टॅटिक पसरण्याची व्याप्ती मर्यादित आहे. म्हणजेच कॅन्सरचा असा टप्पा जिथे रोग शरीरात मर्यादित (सहसा पाचपेक्षा कमी) ठिकाणी पसरला आहे. अशावेळी शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपीद्वारे मर्यादित ठिकाणी पसरलेल्या ट्यूमरवर उपचार केला जातो.
या प्रकारचा कॅन्सर कधी होतो आणि त्याची लक्षणे काय?
ऑलिगो मेटास्टॅटिक कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो. परंतु तो सहसा अशाच लोकांमध्ये आढळून येतो, ज्यांना आधी कॅन्सर झालेला असतो. त्याची विशिष्ट अशी कोणतीही लक्षणे नसतात. हा कॅन्सर शरीरातील ज्या अवयवात पसरतो, त्यानुसार त्याची लक्षणे दिसू लागतात. जसं की:
- हाडांमध्ये- जर तो हाडांमध्ये पसरला असेल तर हाडांमध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात, फ्रॅक्चरही होऊ शकतं.
- फुफ्फुसे- फुफ्फुसांमध्ये पसरला असेल तर श्वास घ्यायला अडचण निर्माण होते किंवा सतत खोकला येतो.
- मेंदू- मेंदूत पसरला असेल तर डोकेदुखी, चक्कर येणं, फिट येणं अशी लक्षणे जाणवू शकतात.
जर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीमध्ये अशी कोणती लक्षणं दिसली आणि बऱ्याच काळापर्यंत त्यातून ती व्यक्ती बरी होत नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या. नियमित चाचण्या आणि योग्य वेळी निदान याने कॅन्सरवर उपचार करता येतात आणि रुग्ण बरा होऊ शकतो. कॅन्सरवरील उपचारादरम्यान कुटुंबीयांनीही सकारात्मक राहणं गरजेचं असतं.
(Disclaimer- या लेखात सुचवलेल्या टिप्स या फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. आरोग्याशी संबंधित कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजाराशी संबंदित कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. TV9 मराठी कोणत्याही दाव्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)
