कमल हासनच्या मुलीच्या प्रायव्हेट फोटो लीक प्रकरणी अखेर एक्स बॉयफ्रेंडने सोडलं मौन
रती अग्निहोत्री यांचा मुलगा तनुज विरवानी हा कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासनला डेट करत होता. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ब्रेकअप केलं होतं. त्यानंतर अक्षराचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते.
अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा तनुज विरवानी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री अक्षरा हासनसोबतच्या ब्रेकअपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तनुजने स्पष्ट केलं की तो आता अक्षराच्या संपर्कात नाही. अक्षरा हासन ही दिग्गज अभिनेते कमल हासन यांची मुलगी असून तिचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. तनुज आणि अक्षरा जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अक्षराचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यावेळी तनुजवरही संशय घेण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्यावेळी तनुजचीही चौकशी केली होती.
अक्षराशी संपर्क का तोडला, यामागचं कारण सांगताना तनुज म्हणाला, “मी अजूनही माझ्या काही एक्स गर्लफ्रेंड्सच्या संपर्कात आहे. आमच्यात ब्रेकअपनंतरही चांगली मैत्री आहे. एकमेकांविषयी आमच्या मनात आदर आहे. कधीकधी जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसाठीचा आदर गमावता आणि त्यांच्यासाठी कोणतीही ठाम भूमिका घेत नाही तेव्हा त्या व्यक्तीला मी माफ करू शकतो पण विसरू शकत नाही. अशा परिस्थितीत मी त्या व्यक्तीसोबत मैत्रीही ठेवू शकत नाही. आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यात खुश आहोत.”
View this post on Instagram
अक्षराचे प्रायव्हेट फोटो लीक झाल्याप्रकरणी तनुज पुढे म्हणाला, “त्याचं आमच्या ब्रेकअपशी काहीच देणंघेणं नाही. पण त्या लीक फोटोंप्रकरणी जे काही घडलं, त्यात एकतर तुम्हाला वाटू शकतं की ते मी केलंय, किंवा मी नाही केलं असं वाटू शकतं, अशा परिस्थितीत तुम्ही माझ्याविषयी ठाम भूमिका घेणं गरजेचं असतं. मला असं वाटतं की प्रत्येकाची आपापली कारणं असतात आणि आता त्या सगळ्या गोष्टींचा काही अर्थच नाही.”
तनुज विरवानी याने गेल्या वर्षी लोणावळामध्ये गर्लफ्रेंड तान्या जेकबशी लग्न केलं. तनुजची पत्नी आता गरोदर आहे. अक्षरासोबतच्या नात्याबद्दल आणि फोटो लीक वादाबद्दल तान्याची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचारला असता तनुज म्हणाला, “विरोधाभास म्हणजे अक्षरासोबत ब्रेकअप झाला त्याचवेळी मी तान्याला भेटलो होतो. तेव्हा आम्ही फक्त चांगले मित्र होतो. पण त्यावेळी आम्ही एकमेकांना भेटू लागलो होतो. त्यावेळी कदाचित कुतूहलापोटी किंवा काळजीपोटी तिने मला अक्षरासोबतच्या प्रकरणाविषयी सर्वकाही विचारलं होतं. माझं उत्तर आजही तेच आहे. मी तिला जे सत्य आहे, तेच सांगितलं.”