4-5 कोटी बजेट अन् कमाई 7 पट अधिक, 2024 चा चित्रपट OTT वरही ठरला सुपरहिट, कुठे पाहू शकता?
सर्वात कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच केली होती 7 पट अधिक कमाई. OTT वरही ठरला सुपरहिट. जिंकले अनेक अवॉर्ड्स.

Bollywood movies : आजच्या घडीला भारतीय चित्रपटांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. आता फक्त मोठे बजेट किंवा कॉमेडी चित्रपट असतील तरच लोक पाहण्यास पसंती देतात. तर अनेकदा मोठ्या कलाकारांचे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात अपयशी ठरताना दिसतात.अशातच काही कमी बजेटमध्ये तयार झालेल्या आणि दमदार कथा आणि प्रभावी अभिनय असलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटांमध्ये अशी काही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत, जिथे छोट्या कलाकारांसह बनवलेल्या चित्रपटांनी आपल्या बजेटच्या कित्येक पटींनी अधीक कमाई केली आहे. इतकेच नाही तर थिएटरमधील यशानंतर हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. अशाच एका विशेष चित्रपटाची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या बजेटपेक्षा तब्बल सातपट जास्त कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दमदार कथा आणि बजेट
1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झालेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार झाला असूनही तो प्रचंड यशस्वी ठरला. हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. जरी तो नामांकनाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही तरी त्याने देश-विदेशात आपली वेगळी छाप उमटवली.
‘लापता लेडीज’ हा एक सोशल कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका नवविवाहित जोडप्याभोवती फिरते. लग्नानंतर ट्रेन प्रवासादरम्यान चुकून दोन नववधूंची अदलाबदल होते. त्यानंतर खरी पत्नी शोधण्यासाठी सुरू होणारा प्रवास आणि त्यातून उलगडणाऱ्या घटना आणि ग्रामीण भारतातील सामाजिक वास्तव, हे सगळे चित्रपटात अतिशय हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.
या कथेमधून कमी वयात मुलींचे लग्न, स्त्रियांची ओळख, स्वातंत्र्य आणि समाजातील रूढी-परंपरांवर नेमका आणि प्रभावी संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटात प्रतिभा रांटा, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवि किशन आणि मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी अतिशय प्रभावी आणि लक्षात राहणारा अभिनय केला आहे. विशेषतः नवख्या कलाकारांनी साकारलेली पात्रे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहेत.
बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवरही यश
‘लापता लेडीज’चे बजेट अंदाजे 4 ते 5 कोटी रुपये इतके होते. मात्र, या चित्रपटाने भारतात सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने तब्बल 25 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. आजही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
