Ujjwal Nikam : बाळासाहेबांची मदत कशी होईल? त्यांचं संजय दत्तवर प्रेम होतं, पण…’त्या’ खटल्यावर पहिल्यांदाच बोलले उज्ज्वल निकम
Ujjwal Nikam On Sanjay Dutt : उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण आणि संजय दत्त यावर भाष्य केलं आहे.

अभिनेता संजय दत्त आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित शस्त्रास्त्र प्रकरण आजही चर्चेत असतं. या प्रकरणात संजय दत्तला सात वर्षांची शिक्षा झाली होती. आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संजय दत्तबद्दल काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. संजय दत्तचं वागणं, त्याला असलेली शस्त्रांची आवड आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेलं त्याचं नातं यावर त्यांनी भाष्य केलं आहे. संजय दत्तनं या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा भोगली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही तो त्यांना भेटला होता आणि त्यावेळी त्यांच्याशी आदरानं बोलला होता.
उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘ही बरीच जुनी गोष्ट आहे. तो माझ्याशी आदराने वागायचा, बोलायचा. त्याला शस्त्राचं वेड होतं. मी त्याला वेडा मुलगा म्हणेन. बाकी मी त्याला फारशी किंमत दिली नाही. तो खटल्यात असल्यामुळे पत्रकारांना उत्सुकता असायची. संजय दत्तनं याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा भोगली. शिक्षेनंतर मला तो भेटला, माझ्याशी आदराने बोलला.’
बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्तला तुरुंगातून बाहेर काढण्यात मदत केलेली. अशा चर्चा होत्या. याबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘बाळासाहेबांची मदत कशी होईल? त्यांचं संजय दत्तवर प्रेम होतं. ती गोष्ट नाकारता येणार नाही. मदत झाली असती तर त्याला अटक झाली असती का? कुणाचे कितीही संबंध असले, तरी माझ्या मते त्याने गुन्हा केला असेल, पुरावा असेल, तर मी तो गुन्हा सिद्ध झाला पाहिजे, हेच बघेन.’
‘बाळासाहेबांनी मला घरी बोलावलेलं. त्यांनी या केसमधून मला काढलेलं. त्यानंतर मी जळगावला जायलाही निघालेलो. पण, गोपीनाथ मुंडेंनी हस्तक्षेप केला, त्यांनी मला थांबवलं. बाळासाहेबांचं संजय दत्तवर प्रेम होतं. जुन्या गोष्टी उगाळून काही फायदा नाही. उद्धव ठाकरेंनाही सगळं माहित आहे.’ असंही उज्ज्वल निकम म्हणाले.
