मालिकेच्या शूटिंगदरम्यान वल्लरी विराजचा अपघात; खांद्याला दुखापत
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वल्लरी विराज आता 'शुभ श्रावणी' या नवीन मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती शिक्षणमंत्र्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. मात्र या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिचा अपघात झाला.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत लीलाची भूमिका साकारून अभिनेत्री वल्लरी विराजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेनं निरोप घेतला तेव्हा प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आता वल्लरी एका नव्या मालिकेतून समोर येणार आहे. ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत वल्लरी श्रावणीची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या प्रोमोचं शूटिंग पार पडलं होतं. या शूटिंगदरम्यान वल्लरीचा अपघात झाला. या अपघातात तिच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे वल्लरीला पुढील काही दिवस खांद्याला आणि हाताला पट्टी बांधून राहावं लागणार आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ही पट्टी पाहताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. परंतु प्रेक्षकांनी काळजी करण्याचं काही कारण नाही, मी रिकव्हरी करत आहे आणि सेटवर माझी खूप काळजी घेतली जात आहे, असं वल्लरीने म्हटलंय.
वल्लरी तिच्या मालिकेविषयी पुढे म्हणाली, “माझ्या नवीन मालिकेचं नाव ‘शुभ श्रावणी’ आहे आणि माझं नाव मालिकेत श्रावणी आहे. ती एक शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे आणि म्हणून घरी प्रेमळ, आपुलकीचं वातावरण नसून कडक नियमबद्ध असं वातावरण आहे. श्रावणीला आई नाहीये, तिचे बाबा पण तिच्याशी बोलत नाहीत. श्रावणीकडे पैसे, मालमत्ता भरपूर आहे. पण तिच्याकडे तिच्या बाबांचं प्रेम नाही. मुळात तिला हेसुद्धा माहीत नाही की का तिच्या बाबांनी लहानपणापासून तिच्याकडे बघितलं नाही? का ते तिच्याशी प्रेमाने बोलले नाहीत? का तिच्याशी ते असं तुटक वागतात? त्यामुळे श्रावणीचा सतत प्रयत्न असतो, की आपण असं काही करू जेणेकरून बाबा तिच्याकडे लक्ष देतील, ते तिच्याशी बोलतील.”
View this post on Instagram
“‘नवरी मिळे हिटलरला‘ मालिका संपल्यानंतरच मला खरंतर झी मराठीने सांगितलं होत की तुझ्यासोबत परत काम करायला आम्हाला आवडेल. मीसुद्धा त्याक्षणाची वाट पाहत होते आणि चार-पाच महिन्यानंतर मला कॉल आला की आम्हाला तुझ्यासोबत परत काम करायचंय, आमची ‘शुभ श्रावणी’ मालिका येतेय. त्यात श्रावणीची भूमिका तूच करायची अशी आमची इच्छा आहे आणि मला ते ऐकून खूपच आनंद झाला. नकार देण्याचा काही विषयच नव्हता. दुसरा तिसरा काहीच विचार न करता मी मालिका स्विकारली. या भूमिकेसाठी खास तयारी केली आहे. माझी आधीची जी भूमिका होती लीलाची, ती खूपच उत्साही, अल्लड होती. परंतु आता श्रावणी आहे ती समजूतदार, सोज्वळ आणि शांत अशी आहे, मनात कितीही तिला वाईट वाटलं असेल, तिच्या मनात कितीही प्रश्नांचा कल्लोळ असला तरी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वावर करणारी अशी आहे. लीला आणि श्रावणी या परस्परविरुद्ध व्यक्तिरेखा आहेत, त्यामुळे मला थोडी जास्त मेहनत करायला लागतेय”, असं तिने सांगितलं.
