Vandana Gupte : तुमचा कोणी अपमान केला तर सहन होईल का? सांगण्याची पद्धत…’आमने सामने’ वादावर वंदना गुप्ते यांचं परखड मत
Vandana Gupte : वंदना गुप्ते यांनी 'आमने सामने' या नाटकाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या ‘आमने सामने‘ हे नाटक चर्चेत आहे. मानधनवाढ मागितल्यामुळे या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी विलास यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. त्यानंतर नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर पुन्हा रोहन आणि केतकी यांनी त्यांची बाजू मांडली. अशातच आता या आरोप प्रत्यारोपानंतर ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या वंदना गुप्ते?
वंदना गुप्ते सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, ‘लीना आणि मंगेश तुमचा मी काल व्हिडिओ पाहिला. मला खूप वाईट वाटलं. तुमचं रडणं पाहून मला फारच भरून आलं. आपण पण आर्टीस्ट आहोत ना गं, यातून गेलोय आपण पण . मला आठवतंय ना माझी ८० रुपयांची नाईट (नाटकाच्या प्रयोगाचं मानधन) १०० रुपये करा, म्हणून हे मी मोहन काकांना १५ वेळा सांगितलं, तेव्हा त्यांनी १०० व्या प्रयोगाला माझी नाईट वाढवली. तू पण आर्टिस्ट आहेस, मंगेश पण आर्टिस्ट आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. बंद करायचं ठीक आहे. पण, आपण असं नाही ना करत अचानक, हा तुमचा शेवटचा प्रयोग. असा कोणी आपला अपमान केला तर तुला सहन होईल का? मंगेशला सहन होईल का? असं नाही करायचं.’
‘सांगण्याची एक पद्धत असते. रोहन आणि केतकीने मागितले वाढवून, त्यांना वाटलं असेल की, नाटकात आपला हातभार आहे. त्यामुळे विचार करून करायला हवं होतं जे काही करायचं आहे ते, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. लीना आणि मंगेश दोघांनाही सांगते, कलाकार म्हणून आपल्याला निर्मात्याकडं मानधन वाढवून मागायचा हक्क आहे. आता आलेली माणसं आहेत, त्यातही तुमच्यासोबत पाच वर्षांपासून जोडली गेलेली आहेत, त्यामुळे असं नका ना करू.’
View this post on Instagram
‘तसंच मागतानाही त्यांनीही विचार करायला हवा होता, तीन तीन वेगळा तुम्ही कसं मागता. तुम्ही पण विचार करायला हवा होता, ती अचानक काढून टाकायचं, हा तुमचा शो नाहीये. हे मला तुमचंही पटलेलं नाहीये. रोहन आणि केतकी, प्रत्येकाची एक गरज असते. प्रत्येकाचं एक स्टेटस असतं. त्याचंही ते वाढत जातं. इतकी ५० वर्षे काम केल्यानंतर अजूनही मी माझं मानधन वाढवा हे सांगायला बिचकते, ही आजकालची मुलं ऐकत नाहीत. त्यांना हवं असतं ते, आणि का असू नये. प्रत्येकाची इच्छा असते ना की, इतकं मिळतंय तर त्यातलं थोडं आपल्यालाही हक्काचं मिळावं. अशी कॉंट्रोव्हर्सी बरी नाहीये. कलाकार म्हणून सांगतेय, निर्माता म्हणून नाही. बाय…’ असं वंदना यांनी शेवटी म्हटलं आहे.
