Vidyadhar Joshi : व्यायाम करताना थकवा, फुफ्फुसांवर जखम अन्…विद्याधर जोशी यांनी केलेला गंभीर आजाराचा सामना, सांगितला भयानक अनुभव
Vidyadhar Joshi On Lungs Disease : विद्याधर जोशी यांनी गंभीर आजाराचा सामना केलेला, त्याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके ‘बाप्पा’ जोशी यांनी आपल्या अभिनयानं नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर मोठं आरोग्यसंकट ओढावलं होतं. एका गंभीर फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. अखेर फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना नवं आयुष्य मिळालं. एका मुलाखतीत त्यांनी या कठीण काळातील अनुभव सांगितला होता.
विद्याधर जोशी यांनी सांगितलं काय घडलेलं?
‘मित्र म्हणे‘ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी म्हणलेले की, ‘या आजारपणाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा, व्यायाम करताना किंवा इमारतीचे मजले चढताना मला नेहमीपेक्षा जरा जास्त थकवा जाणवत होता. माझा चुलत भाऊ डॉक्टर असल्यानं सगळ्यात आधी मी याबद्दल त्याला कळवलं. पण, तो म्हणाला ‘अरे! साठी झाली तुझी…’ त्यामुळे याकडे मी फार लक्ष दिलं नाही. त्यानंतर कोविडची लाट ओसरल्यावर मला जास्त त्रास जाणवू लागला. मला पंधरा-पंधरा दिवसांच्या अंतरानं दोन वेळा कोविडची लागण झाली होती. कोविड आजार बरा होऊनही माझा ताप संपूर्णपणे जात नव्हता. त्यामुळे आम्ही रितसर डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझं सिटीस्कॅन करण्यात आलं आणि त्यात डॉक्टरांना फुफ्फुसावर जखम झाल्याचं दिसून आलं. या काळात पुण्याच्या एका डॉक्टरने हा कोविडचा पॅच नसून हे काहीतरी वेगळं दिसतंय असं मला सांगितलं. त्या काळात सुरुवातीपेक्षा मला आणखी मोठ्या प्रमाणात दम आणि थकवा लागत होता.’
‘शेवटी आम्ही भाटिया रुग्णालयातील डॉ. सुजीत राजन यांच्याकडे गेलो. त्यांनी मला तपासून तुम्हाला लंग्ज फायब्रोसिस झालाय असं सांगितलं. Interstitial lung disease (ILD) असं माझ्या आजाराचं संपूर्ण नाव होतं. इतर आजारांमध्ये लोक बरे होऊन पुन्हा कामाला लागतात असं मी ऐकून होतो. पण, माझ्या आजारावर काहीच उपाय नाही, असं मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं. याशिवाय यावर काही औषध नाही आणि हा आजार आपल्याला थांबवताही येत नाही. डॉक्टरांनी उपाय नाही, हे सांगितल्यावर आम्ही थोडेसे घाबरलो. तरीही हरकत नाही एवढं मी म्हणालो. पहिल्या तपासणीत माझं फुफ्फुस जवळपास १३ टक्के निकामी झालं होतं आणि पुढे तुमचं फुफ्फस आणखी निकामी होईल याची कल्पना मला देण्यात आली होती. हळुहळू डॉक्टरांशी सगळी चर्चा केल्यावर मला या आजाराबद्दल सगळी माहिती मिळाली होती.’
‘मनाची तयारी करून मी वैयक्तिक आयुष्यात उभारी घेतली होती. पण, हळुहळू गोष्टी फार बिकट झाल्या. माझा त्रास वाढू लागला. तो त्रास खरंच शब्दांत सांगता येणार नाही. शेवटी आम्हाला डॉक्टरांनी फुफ्फुसांचं प्रत्यारोपण करणं हा शेवटचा उपाय आहे असं सांगितलं. देशात फक्त हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईत रिलायन्स रुग्णालयात ही फुफ्फस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते, असं मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. यानंतर मला कोणीतरी अवधूत गुप्तेच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये ही शस्त्रक्रिया झाल्याचं सांगितलं. अवधूतने फोनवर मला याचं गांभीर्य, ही शस्त्रक्रिया नेमकी काय आहे, याची माहिती दिली. तसेच यासाठी खूप पैसे लागतात असंही त्याने सांगितलं. त्याच्याकडून खर्चाची आकडेवारी ऐकल्यावर मी पत्नीला ‘अगं मी एवढे पैसे या वयात खर्च करून काय करणार?’ असंही म्हटलं होतं. त्यामुळे पुढचं सगळं आर्थिक नियोजन माझ्या कुटुंबीयांनी बघितलं.’ असं विद्याधर जोशी यांनी शेवटी सांगितलं.
