
दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्याची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित 30 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज उदयपूरच्या एका न्यायालयाकडून पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. 24 डिसेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला होता. विक्रम आणि श्वेतांबरी भट्ट यांनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता. कोर्टाने तपासाच्या संवेदनशील टप्प्याला जामीन अर्ज फेटाळण्यामागचं मुख्य कारण सांगितलं. तसंच यापुढे आणखी अटक आणि चौकशीची गरज भासू शकते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
या प्रकरणातील तपास अद्याप पूर्ण झाला नसल्याचं कोर्टाने सांगितलं. तपास अधिकारी या प्रकरणाशी संबंधित वित्तीय रेकॉर्ड, करार आणि पैशाबद्दल आणखी तपास करत आहेत. या टप्प्यावर जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळा येऊ शकतो, असं न्यायालयाने म्हटलं. या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी होणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
विक्रम भट्ट, त्याची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला. डॉ. मुरडिया यांना त्यांच्या दिवंगत पत्नीवर एक बायोपिक बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी दिनेश कटारिया यांच्याशी संपर्क साधला होता. कटारिया यांच्या सुचनेनुसार मुरडिया यांनी 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील वृंदावन स्टुडिओला भेट दिली होती. याठिकाणी कटारिया यांनी त्यांची विक्रम भट्टशी ओळख करून दिली. या भेटीदरम्यान विक्रम भट्टने चित्रपट निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं आणि डॉ. मुरडिया यांना त्यानुसार पैसे पाठवण्यास सांगितलं. यावेळी विक्रमने असंही सांगितलं की त्याची पत्नी आणि मुलगी या प्रकल्पात सहयोगी म्हणून काम करतील. परंतु नंतर उघड झालं की हे संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं होतं आणि डॉ. मुरडिया यांच्याकडून त्यासाठी कोट्यवधी रुपये उकळण्यात आले होते.
विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी भट्ट यांना 7 डिसेंबर रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. राजस्थान पोलिसांकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर दोघांना 9 डिसेंबर रोजी उदयपूरच्या एका न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर दोघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. याप्रकरणी अद्याप विक्रम किंवा त्याची पत्नी श्वेतांबरीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.