Akshaye Khanna : ज्यांच्यासाठी बॉलिवूड सोडून विनोद खन्नांनी संन्यास घेतला, त्या ओशोंना अक्षय खन्ना मानतो का ?

अभिनेता अक्षय खन्नाने वडील विनोद खन्नांच्या ओशो संन्यास आणि बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. करिअरच्या शिखरावर असतानाही विनोद खन्नांनी कुटुंबाला सोडून ओशोंच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयला तेव्हा हे समजले नव्हतं, पण..

Akshaye Khanna : ज्यांच्यासाठी बॉलिवूड सोडून विनोद खन्नांनी संन्यास घेतला, त्या ओशोंना अक्षय खन्ना मानतो का ?
अक्षय खन्ना- विनोद खन्ना
Image Credit source: social media
| Updated on: Dec 10, 2025 | 11:10 AM

अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) सध्या प्रचंड चर्चेत आहे. हिरोच्या भूमिका करून त्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती तेवढी प्रसिद्धी त्याला व्हिलनच्या भूमिकेने मिळत आहे. ‘धुरंधर’ (Dhurandhar) या सिनेमातील त्याच्या रेहमान डकैत या भूमिकेचं,  कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सध्या चर्चेत असलेला अक्षय नेहमीच लाइमलाइटपासून स्वत:ला दूर ठेवतो. एकांतपणे राहणे त्याला आवडते. वडील विनोद खन्ना यांनाही एकांत प्रिय होता. त्या एकांताच्या शोधात विनोद खन्ना यांनी बॉलिवूड सोडले होते. आणि धडक ओशोंच्या रजनीशपुरममध्ये दाखल झाले होते. करिअर पीकवर असतानाच विनोद खन्ना यांनी हा मोठा निर्णय घेतला होता. बायको आणि दोन मुलांना सोडून ते थेट भारत सोडून ओरेगनला गेले होते. त्याविषयी अक्षयने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वडील विनोद खन्ना यांनी केवळ कुटुंबाला सोडलं नव्हतं. तर त्यांनी संन्यास घेतला होता. संन्यासचा अर्थ जीवनाचा पूर्ण त्याग करणं, कुटुंबाचा त्याग हा त्याचा एक भाग आहे. हा आयुष्य बदलून टाकणारा निर्णय आहे. त्यावेळी वडिलांना हा निर्णय घेणं योग्य वाटलं. मी तेव्हा पाच वर्षाचा होतो. आणि ते समजून घेणं माझ्यासाठी कठिण होतं. आता मी या गोष्टी समजू शकतो, असं अक्षय खन्नाने सांगितलं.

काही तरी घडलं असेल

काही तरी असं नक्कीच घडलं असेल ज्याने त्यांना आतून बाहेरून बदलून टाकलं असेल. त्यामुळे संन्यास घेण्याचा निर्णय घेण्याच्या निर्णयाप्रत ते आले असतील. विशेष म्हणजे आयुष्यात सर्व काही असताना असा निर्णय घेणं वेगळंच. असा निर्णय घेण्यासाठी स्वत:च्या आत मोठा भूकंप होणं महत्त्वाचं असतं. त्यावर ठाम राहणं हे सुद्धा तितकच महत्त्वाचं असतं. काही लोक निर्णय घेतल्यानंतर मला या गोष्टी जमत नाहीत, परत आपल्या मार्गात जाऊ. पण तसं झालं नाही. अमेरिकेतील ओशो आणि कॉलोनीची परिस्थिती, अमेरिकन सरकारशी असलेला वाद या सर्व कारणांमुळे त्यांना परत संसारात यावं लागलं, असं अक्षय म्हणाला.

Akshaye Khanna : याला ऑस्कर द्या… ‘धुरंदर’मधला अक्षय खन्ना याचा ‘रेहमान डकैत’ सुपरहिट, प्रसिद्ध दिग्दर्शकही फिदा

तर ते परत आलेच नसते

कुटुंबासाठी ते परत आले की ओशोंच्या शिकवणुकीवरचा त्यांचा विश्वास उडाला होता? काय घडलं होतं? असा सवाल अक्षयला करण्यात आला. त्यावर त्याने माझ्या वडिलांच्या आयुष्यातील त्या काळातील ज्या गोष्टी मला माहीत आहे, त्यावरून असं वाटत नाही की परत येण्यामागे काही कारण असेल. कम्यून संपलं होतं. नष्ट झालं होतं. सर्वांना आपला मार्ग स्वत: शोधायचा होता. त्यामुळेच वडिलांना परत यावं लागलं. नाही तर मला नाही वाटत ते कधीच परत आले असते, असंही त्याने स्पष्ट केलं.

अक्षय ओशोंना मानतो?

मी ओशोंचे असंख्य प्रवचने वाचली आहेत आणि लाखो व्हिडीओ ऐकले आहेत. मला ओशो प्रचंड भावतात. मी संन्यास घेईन की नाही मला माहीत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी ओशोंच्या प्रवचनांचा आनंद घेऊ शकत नाही आणि त्यांच्या विचाराचा सन्मान करत नाही. माझ्या मनात ओशोंबद्दल नितांत आदर आहे, असंही त्याने सांगितलं.

पुन्हा परतले

विनोद खन्ना यांनी ओशोंचा आश्रम सोडल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. त्यानंतर त्यांनी असंख्य सिनेमात काम केलं. राजकारणातही ते आले. खासदार झाले आणि मंत्रीही झाले. 2017मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण मरेपर्यंत ते सिनेमात काम करत होते.