आमदाराच्या लेकीच्या लग्नात जेवणासाठी अक्षरशः हाणामारी, प्लेट्स खेचल्या, अन्नाची नासाडी; व्हिडीओ पाहून अभिनेता भडकला
Anant Singh: बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या शाही लग्नातील जेवणासाठी झालेली झुंबड पाहून अभिनेता विशाल आदित्य सिंह संतापला. 'आपण सुधारणारच नाही', असं म्हणत त्याने पाहुण्यांच्या वागणुकीवर टीका केली.

बिहारमधील मोकामा इथले आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या शाही लग्नाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या लग्नासाठी लाखो लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लग्नातील भव्य सजावट, पाहुण्यांची गर्दी आणि शाही थाटापेक्षा जेवणाच्या काऊंटरवर झालेल्या गोंधळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेवण मिळवण्यासाठी पाहुण्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, ताटांची फेकाफेक आणि अन्नासाठी सुरू असलेली ओढाताण पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा स्पर्धक विशाल आदित्य सिंह यानेही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात नेमकं काय घडलं?
बिहारचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचं लग्न 25 नोव्हेंबर 2026 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं. या लग्नासाठी सुमारे चार ते पाच लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याचं वृत्त आहे. मेन्यूमध्ये 150 हून अधिक पदार्थ असल्याचीही चर्चा होती. मात्र, अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने जेवणाच्या काऊंटरवर गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये लोक जेवण मिळवण्यासाठी एकमेकांना ढकलताना दिसत आहेत. काही ठिकाणी ताटं हवेत फेकली जात असल्याचं, तर काही लोक जमिनीवर पडलेलं अन्न उचलून खात असल्याचं दिसत आहे. काहींनी ताटांऐवजी पुठ्ठ्याचा वापर करून जेवण घेतलं. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काठ्यांचा वापर केल्याचंही काही व्हिडीओंमध्ये दिसत आहे.
विशाल आदित्य सिंहचा संताप
View this post on Instagram
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना विशाल आदित्य सिंहने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पाहुण्यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “आपण सुधारणारच नाही. आपण कधी सुधारणार? जर आपण सुधारलो, तर मग हे सगळं कोण करणार? असं कोणतं खास जेवण मिळत होतं? कोणते रसगुल्ले किंवा डाळ-भात होतं? कोणी लंडन किंवा फ्रान्समधून आलेलं जेवण नव्हतं. माणसांमध्ये थोडा तरी कॉमन सेन्स असायला हवा.” विशालने पुढे सांगितलं की, या व्हिडीओंमध्ये दिसणाऱ्या लोकांच्या घरातही जेवणाची व्यवस्था असेल. तरीही लग्नात अन्नासाठी अशी धावपळ करणं आणि एकमेकांचा आदर न ठेवणं चुकीचं आहे. रसगुल्ले मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकांची झुंबड उडाली, ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं.
पहा व्हिडीओ-
पुरी-कचौड़ी और आलू कोभी और एक मीठा खाने के चक्कर में अनंत सिंह समर्थक कुत्तो की तरह ऐसे टूट रहे जैसे पहली बार खा रहे हो। https://t.co/hEGyg6jU64
— The Bihar (@Thebihar_in) November 21, 2026
विशालने पाहुण्यांच्या वागणुकीवर आणखी नाराजी व्यक्त केली. लोक या लग्नात नेमकं काय पाहण्यासाठी गेले होते? लग्न कसं झालं, समारंभ कसा पार पडला, यापैकी काहीच त्यांनी पाहिलं नाही. सगळे फक्त जेवणासाठी रस्त्यावर गर्दी करून उभे होते, अशी टीका त्याने केली. ‘इज्जत नावाची गोष्टच राहिली नाही. लोक जेवणाची नासाडी करत आहेत,’ असंही तो म्हणाला.
विशाल आदित्य सिंह हा स्वतः बिहारचा असल्याने या घटनेमुळे राज्याची प्रतिमा खराब होत असल्याची खंतही त्याने व्यक्त केली. बिहारच्या लोकांनी राज्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, मात्र राज्याची बदनामी करणाऱ्या गोष्टींच्या विरोधातही आवाज उठवायला हवा, असं आवाहन त्याने केलं. कायद्यावर विश्वास ठेवण्यासोबतच मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरण्याचाही संदेश त्याने दिला.
