Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबद्दल काय खटकतं? नणंद श्वेताने उत्तर देताच अभिषेक म्हणाला ‘गप्प बस..’
Aishwarya Rai: 'कॉफी विथ करण'मध्ये श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना ऐश्वर्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी ऐश्वर्याबद्दल काय खटकतं, असा प्रश्न नणंद श्वेता बच्चनला विचारण्यात आला.

Aishwarya Rai: बॉलिवूडमधील बच्चन कुटुंब कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतं. ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी संबंधित जुना किस्सा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या जुन्या एपिसोडमध्ये श्वेता बच्चनने तिची वहिनी ऐश्वर्या राय बच्चनबद्दल केलेला मजेशीर खुलासा पुन्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात श्वेता आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या कुटुंबातील नात्यांबाबत अनेक गमतीदार गोष्टी सांगितल्या होत्या. दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने रॅपिड फायर राऊंडमध्ये श्वेताला ऐश्वर्याबद्दल तीन प्रश्न विचारले होते. तिला ऐश्वर्यामध्ये काय आवडतं, काय आवडत नाही आणि कोणती गोष्ट ती सहन करते? यावर श्वेताने ऐश्वर्याचं कौतुक करताना तिला ‘स्वतःच्या मेहनतीने उभी राहिलेली, खंबीर महिला आणि उत्तम आई’ असल्याचं म्हटलं होतं.
मात्र, ऐश्वर्याबद्दल काय खटकतं, असा प्रश्न विचारला असता श्वेताने तिच्या फोन कॉल्स आणि मेसेजला उशिरा उत्तर देण्याच्या सवयीचा उल्लेख केला. ऐश्वर्या फोन किंवा मेसेजला रिप्लाय करण्यासाठी बराच वेळ घेते, अशी गंमतीदार तक्रार तिने केली होती. तर ऐश्वर्याच्या ‘टाइम मॅनेजमेंट’ला मी सहन करते, असंही श्वेताने सांगितलं होतं. याच राऊंडमध्ये श्वेताला भाऊ अभिषेकबद्दलही असेच प्रश्न विचारण्यात आले होते. अभिषेक एक निष्ठावान आणि कुटुंबासाठी समर्पित व्यक्ती असल्याचं तिने सांगितलं. मात्र, त्याच्याबद्दल तिला काय आवडत नाही, असं विचारल्यावर श्वेताने मिश्कील उत्तर दिलं होतं. अभिषेकला स्वत:ला सगळं माहित आहे, असं वाटतं, ही त्याची सवय तिला आवडत नसल्याचं तिने सांगितलं.
‘बायको की आई?’ प्रश्नावरही रंगला किस्सा
या एपिसोडमधील आणखी एक मजेदार क्षण म्हणजे अभिषेकला विचारण्यात आलेला प्रश्न. करण जोहरने त्याला विचारलं होतं की, पत्नी ऐश्वर्या आणि आई जया बच्चन यापैकी तो कोणाला जास्त घाबरतो? अभिषेकने आई जया बच्चन यांचं नाव घेतलं. मात्र, श्वेताने लगेच मध्ये बोलत पत्नीचं नाव घेतलं. त्यावर अभिषेकने आपल्या बहिणीला मजेशीरपणे, ‘हा माझा रॅपिड फायर आहे, गप्प बस’ असं म्हटलं होतं. या प्रसंगाने संपूर्ण सेटवर हशा पिकला होता.
अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी आराध्याचं आगमन झालं. त्यामुळे बच्चन कुटुंबातील या जुन्या गप्पा आजही चाहत्यांसाठी खास ठरतात.
