
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या स्पाय थ्रिलरमध्ये जरी अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असला तरी अक्षय खन्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अक्षय यात हिरोच्या नव्हे तर सर्वांत क्रूर गँगस्टरच्या भूमिकेत आहे. अक्षयने यामध्ये रेहमान बलोच उर्फ रेहमान डकैतची भूमिका साकारली आहे. पडद्यावर तो जितका क्रूर दाखवण्यात आला आहे, तितकाच तो खऱ्या आयुष्यातही होता का, याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. धुरंधर हा चित्रपट वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. 2000 दशकाच्या अखेरीस कराचीमधल्या ल्यारी या गँगस्टरच्या अड्ड्यावर ही कथा घडते. यामध्ये अक्षय रेहमानच्या भूमिकेत असून तो चुलत भाऊ आणि सेकंड-इन-कमांड उजैर बलुचसोबत ल्यारीवर राज्य करतो. तर रणवीर सिंह यामध्ये हमजाच्या भूमिकेत असून तो गुप्तहेर असतो.
खऱ्या आयुष्यातील रेहमान डकैतचं संपूर्ण नाव सरदार अब्दुल रेहमान बलुच होतं. तो पाकिस्तानी गँगस्टर होता आणि 2000 च्या दशकात त्याने ल्यारीमध्ये दहशत माजवली होती. 1975 मध्ये त्याचा जन्म झाला होता. कमी वयातच त्याने ल्यारीमध्ये ड्रग्ज विकण्यास सुरुवात केली होती. वयाच्या 13 व्या वर्षीच त्याने पहिल्यांदा हिंसा घडवून आणली होती. एका व्यक्तीची त्याने चाकूने हत्या केली होती. इतकंच नव्हे तर वयाच्या 19 व्या वर्षी त्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. रेहमानने त्याच्या आईचीच हत्या केली होती.
धुरंधर या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण सीनमध्ये ही घटना काहीशा क्रिएटिव्ह लिबर्टीसह दाखवली आहे. रेहमान नव्वदच्या दशकाच्या अखेरीस हाजी लालूच्या गँगमध्ये सामील होतो आणि 2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर गँगची कमान सांभाळतो. त्यानंतर पुढच्या आठ वर्षांपर्यंत तो ल्यारीला स्वत:चा अड्डा बनवतो. यामध्ये उजैर आणि त्याचा साथीदार बाबा लाडला त्याचे विश्वासू असतात.
डेली गार्डियनच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की रेहमानच्या आदेशानंतर लाडला आणि बलूच त्यांची ताकद आणि दहशत दाखवण्यासाठी ते शत्रूंचं धड शिरापासून वेगळं करून त्याने फूटबॉल खेळायचे. ऑगस्ट 2009 मध्ये ल्यारी गँगवर सरकारने केलेल्या कारवाईदरम्यान रेहमानची हत्या झाली. त्यावेळी तो 34 वर्षांचा होता. रेहमानच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ उजैरने गँगची कमान सांभाळली होती.