‘धुरंधर’मधला तो सीन, ज्यात अक्षय खन्ना सगळ्यांवर पडला भारी; बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’शी होतेय तुलना
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्यातील अभिनेता अक्षय खन्नाची जोरदार चर्चा होत आहे. अक्षय खन्नाच्या जबरदस्त एण्ट्रीने सोशल मीडियावर एकच चर्चा घडवून आणली आहे. या गाण्याची 'जमाल कुडू'शी तुलना होतेय.

अभिनेता अक्षय खन्ना बॉलिवूडमधील अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी आहे, जो फार निवडक चित्रपट आणि निवडक भूमिका मोठ्या पडद्यावर साकारतो, पण त्यातूनही तो प्रेक्षकांवर विशेष छाप सोडून जातो. याआधी ‘छावा’मध्ये त्याने औरंगजेबाची भूमिका साकारून सर्वांनाच चकीत केलं होतं. त्यानंतर आता आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’मधील त्याच्या भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे. या हाय व्होल्टेज स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधनव, अक्षय खन्ना, सारा खान आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. पण त्यातही जेव्हा मोठ्या पडद्यावर अक्षय खन्नाची एण्ट्री होते, तेव्हा एक वेगळाच माहौल तयार होतो. त्याच्या एण्ट्रीची क्लिप सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. काही नेटकरी त्याची तुलना ‘अॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ या गाण्याशी करत आहेत.
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं आहे आणि त्यातील काही दृश्यांमध्ये बदल केले आहेत. हा चित्रपट जवळपास 3 तास 34 मिनिटांचा आहे. बॉलिवूडमधल्या सर्वांत लांब चित्रपटांपैकी हा एक आहे. यामध्ये रणवीरने एजंट हमजा अली मजहरीची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटातील इतरही सर्व कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. परंतु रहमान डकैतीच्या भूमिकेतील अक्षय खन्नाची सर्वाधिक प्रशंसा होत आहे. अक्षयने त्याच्या व्यक्तिरेखेत अक्षरश: जीव ओतला आहे. त्यामुळे सध्या त्याचाच बोलबाला आहे. एण्ट्री सीनमध्ये तो ‘शेर-ए-बलोच’ स्टाइलमध्ये अरबी स्टेप्स करतो, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 1 मिनिट 50 सेकंदाच्या सीनमध्ये रणवीर आणि अक्षय दोघंही एकत्र आहेत. परंतु अक्षय खन्नाच्या ‘शेर-ए-बलोच’च्या स्टेपने इतकं लक्ष वेधलंय की प्रेक्षकांनी रणवीरकडे दुर्लक्ष केलंय. काही तासांतच या सीनला युट्यूबवर लाखो व्हूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
‘धुरंधर’ या चित्रपटाची कथा 1999 ते 2001 दरम्यान घडलेल्या सत्य घटनांपासून प्रेरित आहे. यात कंदहार अपहरण, संसदेवरील हल्ला आणि ल्यारिच्या कटीला गँगसारख्या घटनांना दाखवण्यात आलं आहे. आयबी प्रमुख अजय सन्याल (आर. माधवन) हमजाला एका मोठ्या गुप्त मोहिमेसाठी पाकिस्तानला कसं पाठवतात, हे याच दाखवलं आहे. या चित्रपटाने भारतात तीन दिवसांत अंदाजे 99.59 कोटी रुपये कमावले आहेत.
