पूर्णा आजीच्या भूमिकेत कोणाची एण्ट्री होणार अन् कधी? ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने दिलं उत्तर
'ठरलं तर मग' या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर मालिकेत त्यांची भूमिका कोण साकारणार, याविषयी सतत प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर आता जुई गडकरीने उत्तर दिलं आहे.

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर पंडित यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. ज्योती यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकीच एक त्यांची भूमिका म्हणजे ‘पूर्ण आज्जी’ची. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. आता ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत त्यांची जागा कोण घेणार, याविषयी सतत प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नाचं उत्तर मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने दिलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने विविध प्रश्नांची उत्तरं दिलं. या सेशनदरम्यान एका चाहत्याने पूर्णा आजीच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला.
पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणाची एण्ट्री होणार आणि कधी, असा प्रश्न एकाने विचारला. त्यावर जुईने उत्तर दिलं, ‘याबाबत अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. आम्हा सर्वांनाच तिची खूप आठवण येते. पण आता नवीन कोण येणार.. याबद्दल आम्हालाही माहीत नाही. या सगळ्या गोष्टी चॅनलच्या निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे चॅनलकडून अधिकृतरित्या काही कळल्याशिवाय कोणीही युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांवर येणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नका.’ आणखी एका युजरने जुईला विचारलं, ‘पूर्ण आजीची कमतरता सेटवर जाणवते का?’ त्यावर सेटवरील त्यांच्या खुर्चीचा फोटो पोस्ट करत जुईने लिहिलं, ‘खूप जास्त.’

‘तू बनवलेली कोणती डिश पूर्ण आजींना खूप जास्त आवडायची’, असाही सवाल एकाने केला. त्यावर जुई म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वी मी तिच्यासाठी अळूचं फदफदं केलं होतं आणि ते तिला खूपच आवडलं होतं.’ याआधी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनीही पूर्णा आजीच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. नुकतेच या मालिकेने 900 भाग पूर्ण केले होते. त्यावेळी संपूर्ण टीमने सेटवर पूर्ण आजीच्या नावाने सदाफुलीचं रोपटं लावलं होतं. त्याचा फोटो जुईने चाहत्यांसोबत शेअर केला होता.
