सलमानसोबत पुन्हा काम करणार नाही; असं का म्हणाले महेश मांजरेकर?
महेश मांजरेकरांनी सलमान खानसोबत पुन्हा चित्रपट करणार नसल्याचं स्पष्ट केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं. सलमान आणि महेश मांजरेकर यांनी 'अंतिम' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत पुन्हा काम करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. महेश मांजरेकर यांनी ‘अंतिम’ या चित्रपटासाठी सलमानसोबत काम केलं होतं. ‘अंतिम’चं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. परंतु त्यावेळी काही मतभेद झाले होते. या मतभेदांचा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला.
काय म्हणाले महेश मांजरेकर?
“सलमानसोबत मी ‘अंतिम’ नावाचा एक चित्रपट केला होता. पण जर मला कुणी विचारलं की सलमानसोबत दुसरा चित्रपट करणार का, तर मी नाही म्हणेन. कारण त्याला असं वाटतं की त्याला चित्रपटातलं सगळंच कळतं. त्याचे वडील फिल्ममेकर आहेत. एकदा शूटिंगला तो खूप उशिरा आला, तेव्हा मी त्याच्यावर चिडलो होतो. तो म्हणाला, शिव्या का देतोय? मी त्याला म्हणालो की, मी तुला नाही तर तुझ्यामध्ये जो दिग्दर्शक लपला आहे, त्याला शिव्या देतोय. तू एकदा माझ्या हातात चित्रपट दिलास की सगळं विसरून जायचं”, असं मांजरेकरांनी सांगितलं.
‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात सलमानसोबत त्याचा भावोजी आयुष शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. या चित्रपटात आयुष एका गँगस्टरच्या आणि सलमान पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. या चित्रपटात सलमानची काही जादू चालली नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. 26 नोव्हेंबर 2021 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हा रिमेक होता. या चित्रपटाचं बजेट 40 कोटी रुपये होतं.
चाहते मोठ्या पडद्यावर सलमान आणि त्याच्या भावोजीची टक्कर पहायला उत्सुक होते. परंतु प्रत्यक्षात त्यांची निराशाच झाली. 40 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 5.03 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवसाची कमाई 6.03 कोटी रुपये झाली होती. ‘अंतिम’ने भारतात फक्त 39.57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर जगभरात त्याची कमाई 58.5 कोटी रुपये इतकी झाली होती.
