प्रेम, लग्न अन् विश्वासघाताची कथा, 2 तास 11 मिनिटांच्या चित्रपटाला जबरदस्त IMDb रेटिंग; OTT वरही होतोय ट्रेंड
2 तास 11 मिनिटांच्या या चित्रपटाला फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर सेलिब्रिटींकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. आलिया भट्ट, करण जोहर, समंथा रुथ प्रभू यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी खास पोस्ट लिहिल्या आहेत.

प्रेम, लग्न आणि विश्वासघात यांसारख्या नातेसंबंधांच्या सर्वांत गुंतागुंतीच्या पैलूंचं धाडसी चित्रण करणारा एक चित्रपट सध्या ओटीटी विश्वात धुमाकूळ घालतोय. 2 तास 11 मिनिटांचा हा चित्रपट फक्त प्रेक्षकांवरच प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला नाही तर IMDb वर उत्तम रेटिंग मिळवत त्याने सेलिब्रिटींनाही चकीत केलं आहे. वैवाहिक आयुष्यातील निष्ठा आणि विश्वासघात यांच्यातील अस्पष्ट रेषा यातील कथेत अधोरेखित करण्यात आली आहे. दमदार स्टारकास्ट आणि कुशल दिग्दर्शन यांमुळे हा चित्रपट देशभरात टॉप ट्रेंडिंगमध्ये राहिला आहे. या चित्रपटाचं नाव ‘हक’ असून त्यामध्ये इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका आहेत. शाजिया बानोच्या खऱ्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
चित्रपटात इमरान हाश्मी हा वकील अहमद खानच्या भूमिकेत आहे. तर यामी गौतमने शाजिया बानोची भूमिका साकारली आहे. अहमद आणि शाजियाचं लग्न होतं आणि लग्नानंतर दोघंही आनंदाने संसार करू लागतात. शाजिया जेव्हा दोन मुलांची आई बनते आणि तिसऱ्या बाळासाठी पुन्हा गर्भवती राहते. तेव्हा मात्र तिच्या संसारात पहिल्यासारख्या गोष्टी राहत नाहीत. हळूहळू पती तिच्यापासून दुरावला जातो आणि अचानक एकेदिवशी तो दुसरं लग्न करून घरी येतो. शाजियाला लग्नामागचं खोटं कारण सांगितलं जातं. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे तिचा धक्का बसतोच, परंतु हळूहळू ती त्याचा स्वीकार करू लागते.
View this post on Instagram
एके दिवशी जेव्हा अहमदशी दुसरी पत्नी सायरा तिला सत्य सांगते, तेव्हा सर्वकाही बदलतं. शाजिया तिच्या माहेरी निघून जाते, परंतु आपल्या अहंकारापोटी अहमद तिला घरखर्चाचे पैसे पाठवणं बंद करतो. इथूनच तिची न्यायालयीन लढाई सुरू होते. यानंतरचा दोघांमधील कोर्टरुम ड्रामा प्रेक्षकांना पूर्णपणे खिळवून ठेवणारा आहे. यामी गौतमने या चित्रपटातून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ती आजच्या पिढीतील सर्वांत अनुभवी अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतंच आलिया भट्टनेही तिच्या दमदार अभिनयाचं कौतुक करत तिची चाहती असल्याचं म्हटलंय.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट काही आठवडे पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. यानंतरही ‘हक’ने टॉप 10 चित्रपटांमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं. आयएमडीबीवर या चित्रपटाला 10 पैकी 8 रेटिंग मिळाली आहे.
