
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा लग्नाच्या चार वर्षांतच विभक्त झाले. 2020 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान या दोघांमधील पोटगीचा वाद विशेष चर्चेत होता. आता ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये गायक आदित्य नारायणने सर्वांसमोर धनश्रीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं देताना धनश्रीने पोटगीचा उल्लेख केला आहे. आदित्यने तिला विचारलं, “घटस्फोट घेऊन किती दिवस झाले?” त्यावर धनश्री म्हणाली, “जवळपास एक वर्ष.” तेव्हा अभिनेत्री कुब्रा सैत म्हणते, “तुम्हाला फार लवकर घटस्फोट मिळाला.” हे ऐकताच धनश्री स्पष्ट करते, “कारण आम्हा दोघांना घटस्फोट हवा होता. त्यामुळे जेव्हा लोक पोटगीचं बोलतात, ते चुकीचं आहे.”
आपला मुद्दा मांडताना धनश्री पुढे म्हणते, “मी काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता. माझ्या आईवडिलांनी मला हेच समजावलंय की, त्या लोकांनाच स्पष्टीकरण दे, जे तुझ्या जवळचे आहेत, जी तुझी लोकं आहेत. ज्या लोकांचं तुझ्याशी काही देणं-घेणं नाही किंवा तुझं ज्यांच्याशी काही देणं-घेणं नाही.. त्यांच्याकडे जाऊन गोष्टी समजावून सांगण्याची गरज नाही.” यानंतर आदित्य नारायण तिला लग्न किती वर्षे टिकलं असा प्रश्न विचारतो. त्यावर धनश्री ‘चार वर्षे’ असं उत्तर देते. नंतर कुब्रा तिला विचारते, “लग्नाआधी किती वर्षे एकमेकांना डेट केलं होतं?” तेव्हा धनश्री सांगते, “जवळपास सहा-सात महिने.”
या प्रश्नोत्तरांदरम्यान नयनदीप रक्षित धनश्रीला पुन्हा पोटगीबद्दल विचारतो. “आता तू ज्या गोष्टीबद्दल बोलतेय, जेव्हा त्याविषयी काहीही म्हटलं जात होतं, तेव्हा तुला असं वाटलं नाही का, की आपली बाजू स्पष्ट करावी?” या प्रश्नाचं उत्तर देताना धनश्री सांगते, “जेव्हा हे सर्व घडताना तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो. कारण या सर्वांची गरजच नव्हती. मी फक्त इतकंच सांगू शकते की काहीच खरं नाही. मला वाईट या गोष्टीचं वाटलं होतं की हे सर्व का पसरवलं? मी नेहमीच समोरच्या व्यक्तीचा आदर करेन, कारण माझे संस्कार तसे आहेत.”
2025 या वर्षाच्या सुरुवातीलाच धनश्री आणि चहल विभक्त झाले. यादरम्यान चहलच्या एका टी-शर्टने नेटकऱ्यांचं विशेष वेधलं होतं. ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. त्यावरून धनश्रीने केवळ पैशांसाठी चहलशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.