Corona Vaccine : लस कशी काम करते, दुसरा डोस कधी घ्यावा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

कोविड-१९ विरोधात देशभरात लसीकरण अभियान (Covid19 vaccination) अतिशय जोमाने राबवले जात आहे. मात्र या लसीकरणाबाबत (Corona Vaccine) अनेकांच्या मनात शंका आहेत.

Corona Vaccine : लस कशी काम करते, दुसरा डोस कधी घ्यावा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
corona vaccine


मुंबई : कोविड-१९ विरोधात देशभरात लसीकरण अभियान (Covid19 vaccination) अतिशय जोमाने राबवले जात आहे. मात्र या लसीकरणाबाबत (Corona Vaccine) अनेकांच्या मनात शंका आहेत. या शंका पद्मश्री राष्ट्रपती पुरस्कार व डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित डॉ. संजीव बागाई (Dr Sanjeev Bagai) यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या मनातील प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहेत.  (Corona vaccine safety side effect covid19 vaccination all you need to know maharashtra vaccination program)

लस कशाप्रकारे काम करते?

शरिरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम लस करते. बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरूपात अँटीजेन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकारक्षमता उभारते, आता या अँटीबॉडीज संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. रोगप्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते.

रोगप्रतिकारशक्तीचे विविध स्तर निर्माण करण्यासाठी विविध वेळी विविध स्तरातील लसी दिल्या जातात. काही लसींना बूस्टर डोस आवश्यक असतात तर काही लसी दरवर्षी दिल्या जातात, काही लसी एकाचवेळी दिल्या जातात आणि त्या आयुष्यभर संरक्षण पुरवत राहतात. बाळ जन्माला येते तेव्हा त्याला सर्वसामान्यपणे बीसीजी, पोलिओची तोंडावाटे घ्यावयाची लस, डिफथेरिया, टेटनस, गोवर, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी या लसी दिल्या जातात. आणि आता आली आहे नवी कोविड-१९ विरोधातील लस.

अल्पावधित कोरोना लस तयार

सर्वसामान्यतः कोणतीही लस पूर्णपणे तयार करून लोकांना देण्यासाठी घेऊन येण्यात औषध उत्पादक कंपन्यांना १० ते १५ वर्षांचा अवधी लागतो, विविध प्रकारच्या परीक्षणांचे, चाचण्यांचे वेगवेगळे टप्पे यशस्वीपणे पार करून नियामक संस्थांकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच कोणतीही लस वापरली जाऊ शकते. कोविड महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे, याकाळात जीएव्हीआय आणि जागतिक आरोग्य संघटना यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय संघटना अभूतपूर्व समन्वय आणि सहयोग करत या महाभयानक आजाराविरोधातील लढ्याला वेग यावा यासाठी लस लवकरात लवकर यावी यासाठी प्रयत्न केले. एकंदरीत निकड लक्षात घेऊन यावेळी नियामक, निरीक्षक संस्थांनी सर्व मंजुऱ्यांवर तातडीने कार्यवाही केली पण त्याचवेळी सुरक्षा व चाचण्यांमधील सिद्धांत व नैतिक नियम याबाबत जराही तडजोड केली गेली नाही.

लसीमागचे तंत्रज्ञान

आता जगभरात अनेक कोविड-१९ लसी तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतेक लसी एमआरएनएवर आधारित आहेत. २००६, २०१० आणि पुन्हा २०१२ मध्ये मर्स आणि सार्स मध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते आणि इबोला साथीच्या काळातही त्याच्या आधारे प्रयोग केले गेले होते. इतर लसी वेक्टर-बेस्ड असून त्यामध्ये एक बऱ्याच काळापासूनचा प्लॅटफॉर्म व अनेक वर्षे सिद्ध झालेले तंत्रज्ञान वापरले जाते. याला अडेनो वेक्टर-बेस्ड तंत्रज्ञान म्हणतात ज्यामध्ये अडेनोव्हायरसवर व्हायरस पिगीबॅक्स तयार केले जातात व ते शरीरात प्रवेश करून शरीराची रोगप्रतिकारशक्ती लवकरात लवकर वाढावी यासाठी प्रयत्न करतात.

महाप्रचंड कोल्ड स्टोरेजची आवश्यकता

लस तयार केली जात असल्यापासूनच व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग अर्थात जिथे प्रत्यक्ष लस तयार करण्याचे काम चालते त्या युनिटमध्ये एक विशिष्ट तापमान अतिशय काटेकोर प्रमाणात राखले जाते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात दिवसाचे तापमान अगदी ४५ अंशांपर्यंत देखील वाढू शकते, त्यामुळे लसीसाठी आवश्यक ते तापमान कायम राखले जावे यासाठी महाप्रचंड शीत शृंखला अर्थात कोल्ड स्टोरेज कार्यरत असणे अत्यंत आवश्यक ठरते. काही लसींना २ ते ४ अंश तापमान गरजेचे असते तर काहींना ४ ते ८ अंश. काही एमआरएनए लसींना उणे ७० ते उणे ९० अंश तापमान असलेले कोल्ड स्टोरेज आवश्यक असते.

बर्फपेटीमधून किंवा कोल्ड स्टोरेजमधून लस बाहेर काढल्यानंतर ती काही विशिष्ट दिवस सक्रिय राहते. आता गरज आहे महाप्रचंड कोल्ड स्टोरेजची, आपल्याला शंभर नाही, हजार नाही तर कोट्यवधी डोसेस साठवायचे आहेत, विशिष्ट तापमान राखू शकतील असे कंटेनर्स असायला हवेत. भारतात अशी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. निष्क्रिय, निष्प्रभावी झालेली लस देण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे लस योग्य त्या तापमानाला साठवून ठेवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची मदत करण्यासाठी भारतातील उद्योगक्षेत्राने पुढाकार घेतला ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.

Dr Sanjeev Bagai

Dr Sanjeev Bagai

आता आपण ज्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहोत त्यामध्ये सरकार आणि खाजगी क्षेत्र असा भेदभाव करणे योग्य नाही हे जाणून सरकारने खाजगी क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर सामावून घेतले आहे. खाजगी क्षेत्राने देखील आपल्याकडील ज्ञान, माहिती आणि कौशल्ये यांचा लोकोपकारासाठी उपयोग करवून देत लसींची वाहतूक, योग्य तापमान राखणे अशा कामांमध्ये फक्त महानगरे आणि प्रथम व द्वितीय श्रेणीतील शहरांमध्येच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन विविध भागांमध्ये मोलाची मदत केली आहे कारण देशातील तळागाळातील लोकांपर्यंत लस पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.

हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे गरजेचे  

संपूर्ण समाजात एखाद्या आजाराविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे ही एक महत्त्वाची सुरुवात आहे. आजाराची नैसर्गिक लागण होऊन किंवा लसीमार्फत हे घडून येते, ही सक्रिय रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली की त्या समाजात आजाराचा प्रसार होणे थांबते. हे म्हणजे संसर्गाची शृंखला तोडण्यासारखेच आहे, यासाठी देशातील ६०% ते ७०% व्यक्तींनी लस घेतलेली असणे गरजेचे आहे. ही फार मोठी संख्या झाली. संपूर्ण जगभरात या लसी जितक्या वेगाने पसरतील तितक्या वेगाने या महामारीवरील आपली पकड घट्ट होत जाईल. उन्हाळा संपण्याच्या आधी पुढील काही महिन्यातच देशातील जवळपास ३० कोटी जनतेला कोविड-१९ विरोधातील लस देण्याचे भारताचे उद्धिष्ट आहे.

रोगप्रतिकारशक्तीच्या या स्तरावर पोहोचत असताना आपल्याला एक महत्त्वाची बाब विसरून चालणार नाही की विषाणू आपले स्वरूप, गुणधर्म बदलतात. सक्रिय राहण्यासाठी त्याच्यामध्ये ही उत्क्रांती होत राहते आणि ही सर्वसामान्य गोष्ट आहे. यामुळे विषाणूचा संसर्ग अधिक जास्त वाढतो, तो अँटीबॉडीजना देखील पुरून उरतो. यासाठीच लसीकरण कार्यक्रम लवकरात लवकर आणि विशिष्ट अवधीमध्ये पूर्ण होणे खूप गरजेचे आहे.

कोविड-१९ लसीचे डोस

आजवरच्या बहुतांश लसींमध्ये, खास करून भारतात दिल्या जाणाऱ्या लसींचे दोन डोसेस आवश्यक असतात. या डोसेसच्या वेळांमध्ये फरक असू शकतो. दुसरा डोस किंवा बूस्टर डोस पेशी उत्पन्न करतो, दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे असते. एमआरएनए व्हॅक्सीन्स तीन ते चार आठवड्यांच्या म्हणजे २८ ते ३० दिवसांच्या अंतराने देखील दिल्या जातात. दोन डोसेसच्या यंत्रणेमध्ये रुग्णांची संपूर्ण माहिती व्यवस्थित ठेवणे खूप आवश्यक असते.

अनेक औषध कंपन्या आता इंट्रानेजल वॅक्सीन बनवत आहेत. याचा एकच डोस असतो आणि इंजेक्शनशी संबंधित अनेक समस्या यामुळे टाळता येतात. एकच डोस असल्यामुळे लसीकरणाची अंमलबजावणी अधिक चांगल्याप्रकारे होते व प्रशासनाची सुलभता वाढते.

लस घेण्यात संकोच आणि लसीची सुरक्षितता

या लसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे कोणतेही केस रिपोर्ट्स आलेले नाहीत. या लसीमुळे अनेक अवयव कशातही समाविष्ट होतील असे काहीही घडत नाही. या लसीमुळे नपुंसकत्व येत नाही किंवा मेंदू, हृदय किंवा पाठीचा मणका यांचे काहीही नुकसान होत नाही. या लसीचे साईड इफेक्ट्स इन्फल्युएंझा लसीपेक्षाही सौम्य असल्याचे आढळून आले आहे. प्रभावासंदर्भात बोलायचे झाल्यास ही लस सुरक्षित आहे. या लसीचा प्रत्यक्ष प्रभाव विविध प्रकारच्या पर्यावरणात्मक आणि व्यवस्थापकीय लॉजिस्टिक कारणांमुळे कमी होतो. ५०-६०% पेक्षा जास्त प्रभावी असलेली कोणतीही लस तिची प्रत्यक्ष कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावत असल्याचे सिद्ध झाले आहे.

लस घेण्यात वाटत असलेला संकोच हा अज्ञान आणि अहंकार यांच्या मिश्रणातून निर्माण होतो. मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागरूकता घडवून आणत हा संकोच दूर केला गेला पाहिजे. सर्वात आधी कोट्यवधी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे. हा संदेश सर्वत्र पोहोचला पाहिजे. शास्त्रोक्त, योग्य माहिती प्रत्येक व्यक्तीने पसरवली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरने वॅक्सीन अम्बॅसॅडर बनले पाहिजे. योग्य जागरूकता निर्माण झाली की लसीबाबतचा संकोच नक्की दूर होऊ शकतो. लस घेण्यात संकोच करणारी व्यक्ती देशाचे आणि संपूर्ण जगाचे खूप मोठे नुकसान करत असते हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे आपल्याला हा जागरूकता संदेश लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. सर्वोत्तम सुरक्षेसह संपूर्ण भारत रोगप्रतिकारासाठी सक्षम बनला पाहिजे.

हे नक्की ध्यानात ठेवा आणि काळजी घ्या 

भारतीय वातावरणात जेव्हा एखाद्या मनुष्याला लस दिली जाते तेव्हा त्यानंतर १३-१४ दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजे अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते पण त्या अद्यापही सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन आठवडे अँटीबॉडीज निर्माण होत राहतात आणि मग सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचतात. दुसरा डोस किंवा बूस्टर दिला जातो जो रोगप्रतिकारशक्तीला अधिक प्रोत्साहन देतो, आता फक्त बी पेशींच नव्हे तर टी पेशी देखील निर्माण होऊ लागतात, ज्या दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप आवश्यक आहे.

आजाराची नैसर्गिक लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी संरक्षण तीन महिन्यांपर्यंत टिकू शकते आणि टी पेशी आठ महिन्यांपर्यंत टिकू शकतात. पण दीर्घकालीन दृष्टीने ही रोगप्रतिकारशक्ती पुरेशी नाही. लसीमुळे अधिक जास्त, अधिक प्रभावी, अचूक आणि दीर्घकाळपर्यंत टिकून राहील अशी रोगप्रतिकारशक्ती मिळते.

लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज कित्येक महिने, अगदी वर्षभर देखील निर्माण होत राहतात. त्यामुळे लस जरी घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे आहे.

आरोग्यसेवेवर महामारीचा प्रभाव

या महामारीने संपूर्ण मानवजातीवर थेट हल्ला चढवला आहे. संपूर्ण जगभरात सार्वजनिक आरोग्यसेवांमधील पायाभूत सोयीसुविधांवर किती कमी खर्च केला जात आहे हे या काळात ठळकपणे दिसले. आता मात्र यामध्ये बरेच बदल घडून येतील. परवडण्याजोग्या, सहज उपलब्ध होण्याजोग्या आणि मान्यताप्राप्त आरोग्यसेवांबरोबरीनेच प्रतिबंधात्मक, ज्यामधून पुढील आजारांचे निदान करता येईल अशा, व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. प्राथमिक आरोग्यसेवांवर लक्ष केंद्रित करणे हा आता नियम बनेल. सर्वात शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाची भूमिका, खास करून डिजिटल तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लॉजिस्टिक्स, वैद्यकीय पुरवठा शृंखला इत्यादींचा आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये वापर करून घेणे महत्त्वाचे ठरेल.

NOTE : वरील विवेचन हे डॉक्टरांनी केलेलं आहे. गोदरेज अँड बॉयस, गोदरेज अप्लायन्सेसच्या गोदरेज मेडिकल रेफ्रिजरेशनने हे सार्वजनिक हितासाठी जारी केले आहे.

संबंधित बातम्या 

लसीकरणानंतर घरी गेल्यावर धावपळ करू नका, महापौरांनी केली ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस 

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा 

(Corona vaccine safety side effect covid19 vaccination all you need to know maharashtra vaccination program)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI