तोंडाचा कॅन्सर होणार की नाही? अवघ्या 15 मिनिटात कळणार; नागपुरातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्याने लावला शोध
नागपूरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभूतपूर्व संशोधनाने तोंडाच्या कर्करोगाचे निदान 15 मिनिटांत लाळेच्या चाचणीद्वारे शक्य झाले आहे. हे तंत्रज्ञान MMP2 आणि MMP9 बायोमार्कर्स वापरते आणि 98.04% संवेदनशीलता आणि 100% विशिष्टता दाखवते. या शोधामुळे वेळीच उपचार आणि जीव वाचवणे शक्य होईल, तसेच भारतातील तोंडाच्या कर्करोगाचा भार कमी होण्यास मदत होईल.

कॅन्सर आजाराबाबतचं एक मोठं संशोधन समोर आलं आहे. नागपूरमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्याने मिळून एक क्रांतिकारी शोध लावला आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाळे (Saliva) ची चाचणी करून मुख कर्करोगाचे निदान होणार 15 मिनिटांत करण्याचा शोध या संशोधकांनी लावला आहे. कर्करोगाच्या विरोधातील एका अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वपूर्ण संशोधन समोर आलं आहे. या संशोधनामुळे जगभरातील लाखो मानवी प्राण वाचविण्यात यश मिळू शकेल, अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे.
मुळात कर्करोगाची लक्षणे आणि निदान उशिरा होत असल्याने वेळ, पैसे आणि कित्येक वेळा प्राणांची सुद्धा हानी होते. त्यामुळे, वेळीच निदान हा कॅन्सरपासून मुक्तिचा हमखास मार्ग आहे. मात्र, आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता केवळ 15 मिनिटांत त्याला भविष्यात तोंडाचा कर्क रोग होणार आहे किंवा नाही, याचे खात्रीलायक निदान करणारे हे तंत्रज्ञान आपल्या भारतात विकसित करण्यात आले आहे. आपल्या पद्धतीचे हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे. यामुळे आता कॅन्सर होण्याच्या आधीच त्याचे नेमके निदान शक्य झाले आहे.
पेटंट मिळालं
नागपूरस्थित बायोटेक स्टार्टअप एर्लीसाइनने तोंडाच्या कर्करोगापूर्वीच्या स्थिती शोधण्यासाठी भारतातील पहिली लाळ-आधारित चाचणी विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान बायोमार्कर (MMP2 आणि MMP9) वापरते, जे कर्करोगाच्या लवकर शोधण्यासाठी एक नॉन-इनवेसिव्ह उपाय देते. बायोमार्कर्सचा वापर करून बनवलेल्या या चाचणीत 98.04 टक्के संवेदनशीलता आणि 100 टक्के विशिष्टता असल्याचा दावा केला आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक देवव्रत बेगडे आणि विद्यार्थी शुभेंद्रसिंग ठाकूर यांनी हा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनाला अमेरिकेचे पेटंट आणि भारतीय पेटंट देखिल मिळाले आहे.
सकारात्मक रिझल्ट
आमची चाचणी विशिष्ट लाळेच्या बायोमार्कर्स, MMP2 आणि MMP9 ला लक्ष्य करते. ते तोंडाच्या कर्करोगाच्या प्रगतीचे अत्यंत सूचक आहे. या नॉन-इनवेसिव्ह आणि परवडणाऱ्या चाचणीचा उद्देश लवकर निदान दरात लक्षणीय सुधारणा करणे, भारतात तोंडाच्या कर्करोगाचा भार कमी करणे आणि शेवटी जीव वाचवणे आहे. या तंत्रज्ञानामध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या निदानात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे, याचा आम्हाला विश्वास आहे, असं शुभेंद्रसिंग ठाकूर म्हणाले.
नागपूरमधील सरकारी दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने 150 नमूने घेतले होते. त्यात सुरुवातीच्या अभ्यासात सकारात्मक रिझल्ट लागले. ही चाचणी रुग्णांना तीन जोखीम पातळींमध्ये विभागते: कमी (निरोगी), मध्यम (दृश्यमान जखमांशिवाय कर्करोगाची लवकर प्रगती), आणि उच्च (ट्यूमर किंवा जखमांची उपस्थिती ज्यासाठी पुढील निदान आवश्यक आहे), असंही त्यांनी सांगितलं.