AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संशोधन संस्थेने या तीन औषधांना कर्करोगकारक असल्याचं सांगितलेलं आहे. भारत आणि जगभरातील लाखो लोकं या औषधं घेत आहेत. तर डब्ल्यूएचओ संस्थेतील शास्त्रज्ञांना एका अभ्यासात ही औषधे धोकादायक असल्याचे आढळले आहे. चला तर मग ही तीन औषध कोणती आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

धक्कादायक! 'या' तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
cancer
| Edited By: | Updated on: Aug 25, 2026 | 10:35 PM
Share

सामान्य ते गंभीर आजारावर आजच्या काळात अनेक प्रकारचे औषध व उपचार उपलब्ध आहेत. तर जगभरातील लाखो लोकं उच्च रक्तदाब, फंगल इन्फेक्शन, ऑर्गन ट्रांसप्लांट रिजेक्शन यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार अनेक औषध व गोळ्यांचे सेवन केले जाते. तर नियमितपणे घेत असलेल्या या महत्त्वाच्या आजारांच्या औषधांबद्दल एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे की, मानवी शरीरावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांमुळे कॅन्सर या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो.

एवढेच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने या संशोधनाद्वारे या तीन औषधांना ‘ग्रुप 1’ मानवी कर्करोगकारक (Group 1 Carcinogenic to Humans) श्रेणीत वर्ग केले आहे. याचा अर्थ असा की, त्यांच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणती तीन औषधे कर्करोगजनक असल्याचे घोषित करण्यात आले त्याबद्दल जाणून घेऊयात.

ही तीन औषधे कर्करोगजनक असल्याचे घोषित करण्यात आले

हायड्रोक्लोरोथियाझाइड – हे औषध गोळ्या उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरले जाते.

व्होरिकोनाझोल – अँटी-फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी या औषधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

टॅक्रोलिमस – ऑर्गन ट्रांसप्लांट केल्यानंतर नवीन अवयवाने रिजेक्शन करूनये यासाठी हे औषध दिले जाते.

हायड्रोक्लोरोथियाझाइड

जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग संशोधन संस्था, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने एका अभ्यासात या औषधांशी संबंधित धोके ओळखले आहेत. या २२ सदस्यीय समितीमध्ये भारतीय शास्त्रज्ञ जी. बी. जेना यांचा समावेश होता. IARC ने म्हटले आहे की, हायड्रोक्लोरोथियाझाइडमुळे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि ओठांचा कॅन्सर होऊ शकतो.

अमेरिका आणि डेन्मार्कमध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, दीर्घकाळ हायड्रोक्लोरोथियाझाइड वापरणाऱ्या रुग्णांमध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त होते. याचा अर्थ असा की हे औषध त्वचेची अतिनील (UV) किरणांप्रति संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर डीएनएचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.

व्होरिकोनाझोल –

व्होरिकोनाझोल हे एक अत्यंत पॉवरफूल असे अँटी-फंगल (बुरशीजन्य संसर्गनाशक) औषध आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, प्रदीर्घ काळासाठी व्होरिकोनाझोलचा डोस घेणाऱ्या रुग्णांमध्ये, विशेषतः अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींमध्ये, स्क्वॅमस सेल त्वचेच्या कर्करोगाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळली आहेत. या औषधाचे मानवी शरीरातील चयापचय झाल्यानंतर जे घटक तयार होतात, ते थेट फोटो-टॉक्सिक असतात. यामुळे सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर होणार ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वेगाने वाढतो आणि पेशींच्या अनियंत्रित वाढीला चालना मिळते.

टॅक्रोलिमस

टॅक्रोलिमसचा संबंध नॉन-हॉजकिन लिम्फोमा आणि प्रत्यारोपणानंतरच्या लिम्फोप्रोलिफरेटिव्ह डिसऑर्डरशी जोडला गेला आहे. याशिवाय ल्युकेमिया आणि त्वचेच्या कर्करोगासाठी याचे पुरावे संशोधनातून मिळाले आहेत. या औषधाच्या सेवनाने मानवी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमजोर होते, ज्यामुळे शरीराची असामान्य पेशी नष्ट करण्याची क्षमता कमकुवत होते आणि कॅन्सरसारखा आजारांचा धोका निर्माण होतो.

भारतात या औषधांचा वापर किती प्रमाणात होतो?

भारतात उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी हायड्रोक्लोरोथियाझाइडला प्रथम पसंती दिली जाते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या रुग्णांमध्ये व्होरिकोनाझोलचा सामान्यतः वापर केला जातो. टॅक्रोलिमस प्रामुख्याने अवयव प्रत्यारोपणानंतरच्या काळजीमध्ये दिले जाते. तज्ञांच्या मते, या औषधांचे वर्गीकरण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे अंदाधुंद औषधोपचार, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी औषधे आणि औषधोपचार व प्रशासनाच्या कार्यपद्धतींचे पालन न करणे ही प्रमुख आव्हाने आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us