बॉक्सिंगचा सामना बघून परताना विमान कोसळलं

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:01 AM, 7 May 2019

नवी दिल्ली : मेक्सिकोच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात एक प्रवासी विमान कोसळलं. या विमानात एकूण 13 प्रवासी होते. या दुर्घटनेत पायलटसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केला जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता. हे सर्व लास वेगास येथून बॉक्सिंगचा सामना बघून परतत होते.

या खासगी विमानाने रविवारी 5 मे रोजी लास वेगास येथून उड्डाण केलं. या दुर्घटनेनंतर विमानात प्रवास करत असलेला कुठलीही व्यक्ती जिवंत नसल्याची भीती कोहूइला (मेस्किको येथील राज्य) सरकारने व्यक्त केली. या विमानात प्रवास करत असलेले सर्व प्रवासी हे 19 ते 57 वयोगटातील असल्याची माहिती आहे.

मेक्सिकोच्या वृत्तवाहिन्यांवर या विमानाचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये या विमानाचा काही भाग जळताना दिसून आला. विमानातील सर्व प्रवासी हे लास वेगास येथे शनिवारी बॉक्सिंगचा सामना बघण्यासाठी गेले होते.

मेक्सिकोच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या रिपोर्टनुसार, या विमानाने रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लास वेगास येथून उड्डाण केलं. उड्डाण केल्याच्या दोन तासांनंतर या विमानाशी संपर्क तुटला. काही वृत्तांनुसार, पायलटने वादळापासून वाचण्यासाठी विमानाला मधे कुठेतरी थांबवण्यासाठी सिग्नल दिले होते. खराब हवामानामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

दुर्घटनाग्रस्त विमान हे ‘चॅलेंजर 601’ होतं. उड्डाणानंतर 280 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर या विमानाशी संपर्क तुटला. विमान कंपनीने या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, या दुर्घटनेचा तपास करण्यात येईल असं आश्वासनही दिलं आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : मॉस्कोत विमानाला भीषण आग, 41 प्रवासी जळून खाक

‘ही’ पॉप स्टार कधीही आई बनू शकणार नाही

सत्संगादरम्यान महिलांशी गैरवर्तन, आनंद गिरी महाराजांना ऑस्ट्रेलियात बेड्या

कुत्र्याने तब्बल 14,500 रुपयांच्या नोटा खाल्ल्या, उपचाराला त्यापेक्षा जास्त खर्च