६६ व्या वर्षी महिलेने १० व्या बाळाला जन्म दिला, पहिल्या अपत्याच्या पाच दशकानंतर…
आपण कधीच गर्भनिरोधक वापरले नाही. मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहीजे त्यामुळे मी मुलांना जन्म देत आले असे या महिलेने म्हटले आहे.

जगाची लोकसंख्या ८ अब्जाहून अधिक झाली आहे. परंतू काही जणांना अपत्यांना जन्म देण्यात अनोखा आनंद वाटत आहे. जर्मनीतील एका महिलेची कहाणी तर एकदम वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. ही महिला सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली कारण ती ६६ व्या वर्षी आई झाली आहे. तर तुम्हाला वाटेल की यात आश्चर्य काय ?…या महिलेचे हे दहावे अपत्य असून तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिल्याच्या पाच दशकांनंतर आता दहाव्या बाळाला सुखरुपपणे जन्म दिला आहे.या महिलेने कोणतेही कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर न करता नैसर्गिकपणे या मुलाला जन्म दिला आहे.
एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार अलेक्झेंड्रा हिल्डेब्रांट नावाच्या या महिलेने १९ मार्च रोजी बर्लिनच्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये सिझेरियन सेक्शनद्वारे मुलाला जन्म दिला आहे. मुलाचे वजन सामान्य आहे. महिलेची प्रकृती देखील चांगली आहे. बर्लिनच्या एका म्युझियमचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या हिल्डेब्रांट यांनी पाच दशकांपूर्वी ७० दशकाच्या अखेर आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. त्यानंतर या महिलेने नऊ मुलांना जन्म दिला आहे. ही सर्व मुले देखील सी-सेक्शनद्वारे जन्माला आली आहेत.
आतापर्यंत 9 मुलांना जन्म दिला आहे
या महिलेची सर्वात मोठी मुलगी 46 वर्षांची आहे. तर आर्टीओम 36 वर्षांची आहे. एलिझाबेथ आणि मॅक्सिमिलियन 12 वर्षांची आहे.अलेक्झांड्रा 10, लिओपोल्ड 8, अन्ना 7, मारिया 4, आणि कॅथरीना 2 वर्षाची आहे. हिल्डेब्रांट यांच्या मते मुलांच्या संगोपनासाठी मोठ्या आणि संयुक्त कुटुंबाची गरज आहे. त्यांनी सांगितले की एक मोठे कुटुंब केवळ शानदारच नसते तर मुलांना सांभाळण्यासाठी मोठ्या कुटुंबाची सर्वाधिक गरज असते.
गर्भनिरोधक वापरले नाही..
या वयात गर्भधारणा झाल्याबद्दल विचारले असता हिल्डेब्रांट यांनी सांगितले चांगली जीवन शैली हेच याचे रहस्य आहे. त्या म्हणाल्या की त्यांनी आजपर्यंत कोणत्याही गर्भनिरोधकचा वापर केला नाही. मी खूप सकस आहार घेत असते. रोज एका तासांपर्यंत स्विमींग करते, दोन तास धावते, धुम्रपान करीत नाही आणि मद्यही पीत नाही. मी गर्भनिरोधक वापरीत नाही. लोकांना अधिक मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहीत करायला हवे असेही त्या म्हणाल्या.
