एका देशाचे 15 तुकडे का झाले? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या फाळणीची गोष्ट
देशात जेव्हा जेव्हा फाळणीचा विषय निघतो तेव्हा भारत पाकिस्तानचं उदाहरण समोर येतं. पण यापेक्षाही एका देशाची सर्वात मोठी फाळणी झाली आहे. एक नाही तर 15 देशात त्याची विभागणी झाली आहे. चला जाणून घेऊयात या देशाची गोष्ट

ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्य लढा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी फाळणीची ठिणगी टाकली. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश उदयास आहे. त्यामुळे या फाळणीची चर्चा आजही होते. कारण या फाळणीवेळी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. आजही त्याची झळ भारताला सोसावी लागत आहे. कारण पाकिस्तान कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. असं असताना भारत पाकिस्तान फाळणीनंतर काही वर्षांनी एका देशाचे 15 तुकडे झाले. ही जगातील सर्वात मोठी फाळणी ठरली. ही फाळणी होती सोव्हिएत युनियनची.. यानंतर 15 वेगवेगळे देश उदयास आले. सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ (USSR) ला सोव्हिएत संघ म्हणून ओळखला जात होता. 1922 मध्ये त्याची स्थापना झाली होती. यात समाजवादी आणि प्रजासत्ताक देशांचा समावेश होता. पण रशिया हे कम्युनिस्टांच्या हाती होते. 1991 मध्ये सोव्हिएत संघाची फाळणी झाली. त्यानंतर 15 स्वतंत्र देश निर्माण झाले.
सोव्हिएत युनियनच्या स्थापनेपूर्वी रशियामध्येही हुकूमशाही होती. तेथील शासकाला झार असे म्हंटलं जायचं आणि रोमानोव्ह राजवंशाचा शासक होता. त्यांनी 1613 ते 1917 पर्यंत रशियावर राज्य केले. पण त्यानंतर असमानता आणि आर्थिक अडचणींमुळे लोकांमध्ये असंतोष वाढला. यामुळे झार निकोलस दुसरा यांना सत्ता सोडावी लागली आणि एक तात्पुरते सरकार स्थापन झाले. पण ही सत्ता काही फार काळ टिकली नाही आणि सोव्हिएत राजवट सुरु झाली. 1922 कम्युनिस्ट राजवटीत सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघाची स्थापना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ एक महासत्ता बनला आणि समाजवादी गटाचे नेतृत्व करू लागला.

असं असताना इतका मोठा देश चालवणं कठीण झालं. त्यामुळे अर्थव्यवस्था, उत्पादकता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे पडू लागले. वस्तूंच्या कमतरता आणि महागाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची पकड कमकुवत झाली. युक्रेन आणि लिथुआनिया इत्यादी ठिकाणी राष्ट्रवादी चळवळी फोफावू लागल्या. अमेरिकेची वाढती ताकद, अफगाणिस्तानातील पराभव आणि 1989 मध्ये बर्लिन भिंत पडल्यामुळे सोव्हिएत युनियनचे नियंत्रण खऱ्या अर्थाने कमकुवत झाले. यामुळे जनक्षोभ उसळला आणि डिसेंबर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये फूट पडली आणि अनेक स्वतंत्र देश निर्माण झाले. यात रशिया, युक्रेन, बेलारूस, एस्टोनिया, लिथुआनिया, लाटविया, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि मोल्दोव्हा यांचा समावेश आहे. आता या देशांची स्वतंत्र सत्ता आणि स्वतंत्र अस्तित्व आहे.
