
जून महिन्यात इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धात अमेरेकेनेही भाग घेतला होता. या युद्धानंतर अमेरिका आणि इस्रायलचा शत्रू देश इराण आता आपली लष्करी ताकद वाढवताना दिसत आहे. इराण आता चीनशी करार करण्याच्या प्रयत्नात आहे. इराण इंटरनॅशनलमधील एका बातमीनुसार, या करारात इराण चीनला तेल देणार आहे, या तेलाच्या बदल्यात चीनकडून क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली घेणार आहे. अमेरिकेच्या विराधाला न जुमानता हा करार होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) आणि सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफने चिनी कंपनी हाओकुन एनर्जी ग्रुपकडून क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु केली आहे. यात चीन इराणकडून तेल घेऊल आणि त्या बदल्यात इराणला शस्त्रे पुरवणार आहे. या करारामुळे इराणची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायलसोबतच्या युद्धात इराणच्या लष्करी उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि आपली ताकद वाढवण्यासाठी इराण हा करार करणार आहे. या करारात इराण चीनकडून चीनकडून HQ-9B सारखी आधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. हा करार झाल्यास इस्रायल आणि चीनची डोकेदुखी वाढणार आहे.
इराण इंटरनॅशनलने दिलेल्या एका वृत्तानुसार 1980 आणि 1990 च्या दशकात इराणने चीनकडून जहाजविरोधी क्रूझ मिसाईल खरेदी केली होती. यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसच्या माहितीनुसार 1991 ते 1994 या काळात इराणने चीनकडून शस्त्रांचा मोठा साठा आयात केला होता.2015 पासून चीनने इराणला थेट शस्त्रे विकलेली नाहीत. मात्र आता दोन्ही देशांमध्ये याबाबत करार होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात इराणची ताकद वाढणार आहे.
हाओकुन एनर्जी ग्रुप या कंपनीवर 2022 मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने बंदी घातली होती. आयआरजीसीच्या कुद्स फोर्सकडून लाखो बॅरल तेल खरेदी केल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला होता. हाओकुनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता याच कंपनीसोबत इराणचे कराराबाबत बोलणे सुरू आहे.