Donald Trump: भारतासह 11 देशांचा अमेरिकेला थेट विरोध, दिला गंभीर इशारा, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ पुन्हा ताब्यात घेण्याबाबत भाष्य केले होते. अशातच आता ट्रम्प यांच्या या इराद्याला भारतासह 11 देशांनी थेट विरोध केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ पुन्हा ताब्यात घेण्याबाबत भाष्य केले होते. अशातच आता ट्रम्प यांच्या या इराद्याला भारतासह 11 देशांनी थेट विरोध केला आहे. मॉस्को फॉरमॅटच्या सातव्या बैठकीत याबाबत एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. यात ‘अफगाणिस्तान किंवा त्याच्या शेजारील देशांमध्ये लष्करी पायाभूत सुविधा स्थापन करण्याचा कोणताही प्रयत्न प्रादेशिक शांततेच्या विरोधात आहे आणि तो सहन केला जाणार नाही’ असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी दिली होती तालिबानला धमकी
सप्टेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अफगाणिस्तानने बग्राम हवाई तळ परत न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी, बग्राममध्ये कोणताही परदेशी तळ बांधू दिला जाणार नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर आता भारत, रशिया, चीन, इराण आणि पाकिस्तानसह 11 देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बग्राम हवाई तळ ताब्यात घेण्याच्या इराद्याला विरोध केला आहे.
11 देशांचा अमेरिकेला विरोध
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाकीर जलाल यांनी म्हटले होते की, ‘आम्ही 2020 च्या करारातच स्पष्ट केले होते की आमच्या देशात अमेरिकेच्या लष्कराला जागा मिळणार नाही.’ त्यानंतर आता रशियाची राजधानी मॉस्को येथे 11 देशांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला भारत, अफगाणिस्तान, इराण, कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्तकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही या परिषदेत भाग घेतला होता.
डोनाल्ड ट्रम्प चिंतेत
या परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सर्व देशांनी अफगाणिस्तानला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. सर्व देशांनी अफगाणिस्तानसोबत आर्थिक आणि व्यापारी संबंध आणि गुंतवणूक सहकार्य वाढविण्यावर भर दिला. तसेच आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, शेती आणि आपत्ती व्यवस्थापनात अफगाणिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला. याचाच अर्थ सर्व देशांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. तसेच हे सर्व देश अफगाणिस्तानच्या मदतीसाठी एकवटले असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
