दररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, 'अलिबाबा'च्या श्रीमंतीचा नवा फंडा

कार्यालयीन कामकाजाची वेळ घटवून केवळ 4 तास काम आणि ते सुद्धा आठवड्यातील 3 दिवस, असं सूत्र जॅक मा यांनी सांगितलं.

दररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, 'अलिबाबा'च्या श्रीमंतीचा नवा फंडा

बीजिंग : आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले जॅक मा (Jack Ma) यांनी नवा सक्सेस मंत्रा दिला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात (artificial intelligence) सध्या आठवड्यातून केवळ 12 तासच काम करणे क्रमप्राप्त आहे, असं अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांनी म्हटलं.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या  मदतीने हे शक्य आहे, असं जॅक मा म्हणाले. कार्यालयीन कामकाजाची वेळ घटवून केवळ 4 तास काम आणि ते सुद्धा आठवड्यातील 3 दिवस, असं सूत्र जॅक मा यांनी सांगितलं. माणसाचं काम कमी आणि तंत्रज्ञानाचं काम जास्त या सूत्राने मनुष्याच्या कामाची वेळ कमी करता येऊ शकते असं ते म्हणाले.

यापूर्वी जॅक मा यांनी दिवसाचे 12 तास याप्रमाणे आठवड्याचे 6 दिवस काम असं सूत्र सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी त्यामध्ये कमालीचा बदल सांगितला.

चीनमधील शांघाय इथे झालेल्या आर्टिफिशल इंटेलिजन्स कॉन्फरन्सला (World AI Conference) संबोधित करताना जॅक मा यांनी कामाची नवी पद्धत सांगितली. ते म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे लोक आठवड्यातले तीन दिवस आणि ते ही दिवसातून केवळ चार तास काम करु शकतात”

जॅक मा संबोधित करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत मंचावर कार कंपनी टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क ( Elon Musk) उपस्थित होते.

शिक्षण व्यवस्था सुधारण्याची गरज

जॅक मा यांनी यावेळी शिक्षण व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचं सांगितलं. “प्रत्येक मनुष्य, देश आणि सरकारला पुढील 10-20 वर्षात शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्याला अशी शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळू शकेल. एक अशी नोकरी ज्यामध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि  12 तासच काम असेल. जर आपण शिक्षण व्यवस्था बदलली नाही तर हे अशक्य असेल”, असं जॅक मा म्हणाले.

आधी म्हणाले होते दिवसाला 12 तास काम

जॅक मा यांनी आता आठवड्याला 12 तास काम सांगितलं असलं तरी यापूर्वी एप्रिल महिन्यात दिवसाला 12 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. केवळ 8 नव्हे तर 12 तास काम करणारी माणसं हवी, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. मात्र त्यावेळी चीनच्या मीडियात त्यांच्यावर टीका झाली होती.

2.88 लाख कोटीचे मालक

जॅक मा हे 2.88 लाख कोटी रुपयांचे मालक आहेत. वयाच्या 54 व्या वर्षी जॅक मा यांनी निवृत्ती घोषित केली. बिल गेट्स यांच्याप्रमाणे आपल्या नावाने संस्था सुरु करुन शिक्षणावर काम करणार असल्याचं ते म्हणाले.

भारतातही गुंतवणूक

चीनच्या अलिबाबा कंपनीने जगभरात गुंतवणूक केली आहे. भारतातही या कंपनीची गुंतवणूक आहे. यूसी ब्राऊजर आणि यूसी न्यूज शिवाय अलिबाब डॉट कॉम वेबसाईट प्रसिद्ध आहे. या कंपनीने पेटीएम, बिग बास्केट, झोमॅटोमध्येही गुंतवणूक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *