
Donald Trump Tariff On China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या टॅरिफमुळे भारताला आर्थिक फटका बसत आहे. रशियावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्र उचललेले आहे. दरम्यान, अलिकडेच ट्रम्प यांनी चीनवरही 50 ते 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मात्र चीनने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. चीनच्या या प्रत्युत्तरानंतर आता ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनावर प्रत्युत्तर दिले आहे. संवेदनशील मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही शांततेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या चर्चेला प्राधान्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर चीनवर टॅरिफ लावण्यात आल्यास चीनदेखील रेसिप्रोकल टॅरिफ लावेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वांग यी यांच्या विधानामुळे आता ही शक्यतादेखील मावळली आहे.
चायना डेली या चीनच्या माध्यमसंस्थेने वांग यी यांनी केलेल्या विधानाबाबत वृत्त दिले आहे. याच वृत्तानुसार वागं यी हे शनिवारी स्लोवेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथे माध्यमांशी बोलत होते. युद्ध हे अडचणींवरचे समाधान नाही. लादण्यात आलेल्या बंधनांमुळे समस्या आणखी अडचणीच्या होतात. चीन युद्धात कधीच सहभागी होत नाही. चीन युद्धाची योजनादेखील तयार करत नाही. चीन शांततेच्या मार्गाने केलेल्या चर्चेला प्राधान्य देतो, असे मत यावेळी वांग यी यांनी व्यक्त केले.
तसेच चीन एक जाबबदारी सांभाळणारा देश आहे. या देशाचा शांतता आणि सुरक्षेच्या बाबतीत चांगला इतिहास आहे. सध्याच्या काळात जगात अराजकता आणि संघर्षाची स्थिती आहे. चीन आणि युरोपाने एकमेकांचे प्रतिस्पर्धी होण्यापेक्षा एकमेकांचे मित्र होणे गरजेचे आहे, असेही मत वांग यी यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, ट्रम्प चीनवर नाटो सदस्य राष्ट्रांनी 50 ते 100 टक्के टॅरिफ लावावा, असे आवाहन केल्यानंतर आता चीनने वरील प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नेमके ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.