मसूद अजहरविरोधात अमेरिकेचा नवा प्रस्ताव, चीनचा तिळपापड

मसूद अजहरविरोधात अमेरिकेचा नवा प्रस्ताव, चीनचा तिळपापड

वॉशिंग्टन : चीनने मंगळवारी अमेरिकेवर संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादविरोधी समितीचे अधिकार कमी केल्याचा आरोप केलाय. अमेरिका मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी दबाव तयार करुन संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद समितीचे अधिकार कमी करत आहे. अमेरिकेच्या या पावलामुळे प्रकरण आणखी चिघळू शकतं, असंही चीनने म्हटलंय.

अमेरिकेने फ्रान्स आणि ब्रिटनच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा तयार केला होता. दोन आठवड्यापूर्वी मसूद अजहरला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला चीनने आडकाठी केल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचललं होतं. यानंतर चानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी अमेरिकेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

अमेरिकेच्या या पावलामुळे दहशतवादविरोधी समितीच्या अधिकारांवर गदा येईल. देशांच्या एकजुटतेसाठी हे अनुकूल नाही आणि यामुळे गोष्टी आणखी बिघडू शकतात. आम्ही अमेरिकेकडून अपेक्षा करतो, की ते याबाबतीत सावधपूर्वक पाऊल उचलतील आणि जबरदस्तीने प्रस्ताव पुढे ढकलणार नाहीत, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

काय आहे अमेरिकेचा प्रस्ताव?

यूएनएससी म्हणजेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केल्यानंतर 15 दिवसातच अमेरिकेने एका प्रस्तावाचा मसुदा तयार केलाय. मसूद अजहरवर वेगळ्या पद्धतीने बंदी घालण्याबाबतच्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. जगातील सर्वात शक्तीशाली 15 देशांना हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनीही चीनने मसूदला वाचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली. चीनकडून त्यांच्याच घरात लाखो मुस्लिमांचं शोषण केलं जातंय, पण एका हिंसक मुस्लीम दहशतवादी संघटनेला वाचवलं जात आहे, असं ट्वीट पॉम्पियो यांनी केलं. शिवाय हे जग मुस्लिमांविषयी चीनचा दुटप्पीपणा सहन करणार नाही, असंही पॉम्पियो म्हणाले.

प्रस्तावाच्या मसुद्यात पुलवामा हल्ल्याप्रकरणीही निषेध करण्यात आलाय. शिवाय मसूद अजहरला अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट यांसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्राकडून बंदी घातल्यास मसूद अजहरला पाकिस्तानच्या बाहेर कुठेही जाता येणार नाही. त्याची संपत्ती जप्त केली जाईल.

अमेरिकेने तयार केलेल्या मसुद्यावर मतदान कधी होईल हे अजून निश्चित नाही. पण चीनकडून यावेळीही वीटोचा वापर केला जाऊ शकतो. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स आणि रशियासह चीनही यूएनएससीचा सदस्य आहे. या पाच राष्ट्रांकडे वीटोचा अधिकार आहे.

मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या समितीमध्ये चार वेळा प्रयत्न करण्यात आलाय. चीनने यापैकी तीन वेळा वीटोचा वापर केला आणि नुकत्याच सादर केलेल्या एका प्रयत्नातही आडकाठी केली, ज्यामुळे प्रस्ताव पुन्हा एकदा नऊ महिन्यांसाठी होल्डवर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *