बिलकूल टेन्शन घेऊ नका… दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी विशेष विमान; देशात या नेत्याचा सर्वात आधी पुढाकार

इराण-अमेरिका संघर्षामुळे दुबईतील हवाई वाहतूक ठप्प झाल्याने अनेक महाराष्ट्रीय नागरिक दुबईत अडकले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत स्टार एअरची विशेष विमाने फुजैरा एअरपोर्टहून मुंबईसाठी व्यवस्था केली. यामुळे एकूण १६४ प्रवासी सुखरूप मायदेशी परतणार आहेत . ठाणे, पुणे, उमरगासह अनेक भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला.

बिलकूल टेन्शन घेऊ नका... दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी विशेष विमान; देशात या नेत्याचा सर्वात आधी पुढाकार
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी विशेष विमान
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 03, 2026 | 11:50 AM

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर जोरदार हल्ला चढवला आणि जगात एकच गोंधळ माजला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई मारले गेले. त्यामुळे संतप्त इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ला चढवला. सहा देशातील विविध ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या तळांना इराणने लक्ष्य केलं. दुबईतील अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवताना दुबईतील इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली . यामुळे जगभरातील देशांनी आखाती देशातील विमान उड्डाणं थांबवलीत.भारतातून, महाराष्ट्रातून पर्यटनासाठी, कामासाठी गेलेले अनेक नागरिक दुबईत अडकले असून उड्डाणं रद्द झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परतणं शक्य नाही.

यामुळे ते नागरिक, त्यांचे नातेवाईक अतिशय चिंतेत होते. मात्र आता दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांच्या मदतीसाठी देशातील, राज्यातील मोठ्या नेत्याने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार आहेत. आज संध्याकाळी 164 प्रवासी हे मुंबईत दाखल होतील. त्यामुळे महाराष्ट््रवासियांना दिलासा मिळणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी तातडीने उचलली पावलं

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत.

त्यांची वेळ खालीलप्रमाणे :

• VTGSO – संध्याकाळी 3.30 वाजता टेकऑफ

• VT GSH – संध्याकाळी 4.30 वाजता टेकऑफ

या दोन्ही विमानांमधून एकूण 164 प्रवासी आज संध्याकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे 84 विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या 164 प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार प्रवीण स्वामी यांचा दुबईत अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क

दुबई येथे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उमरगा शहरातील चार ज्येष्ठ नागरिक तेथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर उमरगा-लोहरा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी संबंधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची विचारपूस केली. प्रशासनाकडून लवकरच त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार स्वामी यांनी दिली. तसेच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला परिस्थितीची माहिती देण्यात आल्याचेही आमदार स्वामी यांनी सांगितले.

दुबईमध्ये सध्या असलेले शिवानंद माशाळकर यांनी केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत संपर्क झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील परदेशात अडकलेल्या नागरिकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या हेल्पलाइनवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले आहे.

 

Follow Us