ट्रम्प-मस्क यांच्यात खुले शाब्दिक युद्ध…, डोनाल्ड ट्रम्पकडून अनुदान रद्दची धमकी तर एलॉन मस्ककडून महाभियोगची पोस्ट
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील संघर्ष वाढला आहे. आता ट्रम्प यांनी लिहिले की, आमचे अब्जावधी डॉलर वाचवण्याचा सोपा उपाय मिळाला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपन्यांना देण्यात येणारे अनुदान बंद करावे, तसेच त्यांना देण्यात येणारे सरकारी ठेकेही बंद करण्यात यावे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील वाद वाढला आहे. दीर्घकाळापासून त्यांची असलेली मैत्री आता शत्रुत्वात बदलली आहे. दोघांनी एकमेकांवर जोरदार हल्ले सुरु केले आहे. माझ्याशिवाय ट्रम्प निवडूनच आले नसते, असे मस्क यांनी म्हटले होते. त्याला ट्रम्प यांनी उत्तर देत मस्क नसते तरी विजय माझाच होतो, असा दावा केला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एनॉल मस्क यांच्या कंपन्यांना मिळणारे अनुदान आणि सरकारी ठेके रद्द करण्याची धमकी दिली आहे. त्यावर मस्क यांनी पलटवार करत महाभियोग चालवण्यासंदर्भातील पोस्ट केली आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या धमकीनंतर मस्क यांची कंपनी टेस्ला आणि SpaceX च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी Truth Social वर लिहिले आहे की, आमचे अब्जावधी डॉलर वाचवण्याचा सोपा उपाय मिळाला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपन्यांना देण्यात येणारे अनुदान बंद करावे, तसेच त्यांना देण्यात येणारे सरकारी ठेकेही बंद करण्यात यावे. मला आश्चर्य वाटते की यापूर्वी बायडेन यांनी हा निर्णय का घेतला नाही. एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या धमकीला एका शब्दात उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले, ‘Whatever’ म्हणजे तुमची जशी मर्जी तसे करा.
शेअरमध्ये घसरण
वॉल स्ट्रीटवर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादाचा परिणाम दिसला. मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. टेस्लाचे शेअर 14.3% घसरले आहे. यामुळे कंपनीची मार्केट व्हॅल्यू 150 बिलियन डॉलरवर आली आहे. टेस्लाच्या इतिहासात एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. शेअर बाजार बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वी मस्क यांनी X वर एक पोस्ट लिहिली. त्यात ‘Yes’ लिहिले. ज्यामध्ये ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याचे म्हटले आहे.
तो फोटो व्हायरल…
मस्कसोबतच्या वादाच्या दरम्यान, 2014 चा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मस्क आणि एपस्टाईनची सहकारी घिसलेन मॅक्सवेल एकत्र दिसत आहेत. मस्क यांनी यापूर्वी या फोटोचे वर्णन ‘फोटोबॉम्ब’ असे केले होते. आणि मॅक्सवेलशी त्यांचे कोणतेही वैयक्तिक किंवा व्यावसायिक संबंध नसल्याचे म्हटले होते. परंतु 2018 मध्ये एपस्टाईनने दावा केला की त्यांनी मस्क यांनी काही सल्ला दिला होता, जो मस्क यांनी नाकारला होता.
