
America And Pakistan : गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांच्या फारच जवळ आलेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारविषयक करार झालेले आहेत. याच कराराअंतर्गत पाकिस्तानमधील मौल्यवान खनिजांचे उत्खनन केले जाणार आहे. याचा थेट आर्थिक फायदा उद्योगपती असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना होणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान, एकीकडे या दोन्ही देशांत मोठे आणि महत्त्वाचे व्यापार करार होत असताना आता अमेरिकेच्या सल्ल्यानुसार पाकिस्तान आपल्या प्रांतांचे 12 तुकडे करण्याच्या विचारात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये सध्या एकूण चार प्रांत आहेत. पंजाब, बलुचिस्तान, सिंध, पख्तुनख्वा असे या चार प्रांतांचे नाव आहे. या चारही प्रांतांत सध्या अशांततेची स्थिती आहे. या भागांत गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानची परिस्थितीत तर फारच बिकट आहे. या दोन प्रांतात पाकिस्तानी सेना कायम तैनात असते. हीच स्थिती लक्षात घेता अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात पाकिस्तानचे एकूण 12 तुकडे करण्यावर चर्चा झालेली आहे. या प्रस्ताअंतर्गत पंजाब प्रांताचे चार तुकडे, सिंध प्रांताचे दोन तुकडे, खैबर पख्तुनख्वाचे दोन तुकडे आणि बलुचिस्तानचे चार तुकडे करायचे, असा तिथे विचार केला जातोय.
अमेरिकेच्या सल्ल्यानुसार आता पाकिस्तानात चार प्रांतांचे 12 तुकडे केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा सर्व उद्योग नेमका का केला जातोय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचे जावाई जेरेड कोरी कुशनर सध्या पाकिस्तानच्या लाहोर दौऱ्यावर आहेत. कुशनर हे मोठे उद्योगपती आहे. ते पाकिस्तानाला तेथील खनिज, इंधन काढण्यासाठी मदत करणार आहेत. अमेरिका-पाकिस्तान यांच्यात तेल, दुर्मिळ खनिजांचा व्यापार होणार आहे. त्यासाठीच पाकिस्तानचे 12 तुकडे करण्याचा विचार चालू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प यांचे जावई कुशनर यांनी पाकिस्तानी सेनेचे प्रमुख असीम मुनीर यांना पाकिस्तानचे एकूण 12 भाग करण्याचे सूचवले आहे. पाकिस्तानने अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी तसेच ही गुंतवणूक करताना सुरक्षेची हमी मिळावी यासाठी कुशनर यांनी मुनीर यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानचे एकूण 12 भाग केल्यानंतर अमेरिकेच्या मदतीने येथे तेल, खनिजांचे उत्खनन केले जाणार आहे. आगामी पाच वर्षांत येथे तीन लाख कोटी रुपयांचा व्यापार होणार असल्याचे बोलले जात आहे.