Sergio Gor : एलॉन मस्कशी दुश्मनी, रशियाशी कनेक्शन.. भारतातील US चे राजदूत गोर आहेत तरी कोण ?

Sergio Gor US ambassador in India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांची भारतातील नवीन अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सर्जियो गोर यांचा जन्म उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झाला, जो त्यावेळी यूएसएसआरचा भाग होता. 1999 साली ते 12 वर्षांचा असताना अमेरिकेत आले. एलोन मस्कसोबत झालेल्या वादानंतर गोर अलीकडेच चर्चेत आले होते.

Sergio Gor : एलॉन मस्कशी दुश्मनी, रशियाशी कनेक्शन.. भारतातील  US चे राजदूत गोर आहेत तरी कोण ?
डोनाल्ड ट्रंप आणि सार्जियो गोर
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Aug 23, 2025 | 11:12 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेंशियल पर्सनल ऑफिसचे संचालक सर्जियो गोर यांचे नाव आता भारताशी जोडले जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोर यांची भारतातील नवीन अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच, गोर यांना दक्षिण आणि मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूताची जबाबदारीही देण्यात आली आहे. शुक्रवारी (22 ऑगस्ट) खुद्द ट्रंप यांनीच ही घोषणा केली. ताश्कंद (उज़्बेकिस्तान)मध्ये जन्मलेले आणि सध्या व्हाईट हाऊसच्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक असलेले सर्जियो गोर हे आता भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहतील.

काही काळापूर्वी ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा गोर प्रसिद्धीच्या झोतात आले. याआधी त्यांचा रशियाचा रहस्यमय दौराही चर्चेचा विषय बनला होता. कोण आहेत सर्जियो गोर, चला जाणून घेऊया.

सर्वात तरूण राजदूत

सर्जिय गोर यांचं वय अवघं 39 वर्षांच असून भारतात नियुक्ती होणारे ते अमेरिकेचे सर्वात तरूण राजदूत असतील. ते एरिक गार्सेटी या डेमोक्रॅटिक नेत्याच्या जागी येतील, गार्सेटी हे बायडेन यांच्या प्रशासन काळानमतर कॅलिफोर्नियाला परतले होते. भारतात अमेरिकेचे राजदूत असण्याबरोबरच ते दक्षिण आणि मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूताची जबाबदारीही सांभाळतील असं समजतं. या क्षेत्रात पाकिस्तान आणि बांग्लादेश यांचा समावेश आहे, मात्र तिथे अमेरिकेचा पूर्णवेळ राजदूत नाही.

ट्रंप यांची अनेक काम सांभाळतात गोर

गोर हे डोनाल्ड ट्रम्पसाठी व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेंशियल पर्सनल ऑफिसचे डायरेक्टर म्हणून काम करत होते. ट्रम्पच्या मते, गोर यांनी विविध विभागांमध्ये सुमारे 4, 000 MAGA (America First) समर्थकांची भरती केली. गोर हे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय प्रचार पथकाचा आणि “मेक अमेरिका ग्रेट अगेन” चळवळीला पाठिंबा देणाऱ्या सुपर पीएसी (पॉलिटिकल ॲक्शन कमिटी) याचाही भाग होते.  ट्रम्पची सर्वाधिक विक्री होणारी पुस्तके देखील त्यांनी प्रकाशित केली.

एलन मस्कशी दुश्मनी, साप असाही उल्लेख

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वाढत्या वादामागे सर्जिय गोर हे कारण मानले जाते. या वादानंतर काही महिन्यांपूर्वी,   एलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये सर्जियो गोरला ‘साप’ असंही म्हटले होते. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनंतर ही टिपण्णी केली होती. या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की हजारो कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे काम पाहणारे गोर यांनी अद्याप त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रं पूर्णच केलेली नाहीत आणि ते अजूनही अंतरिम मंजुरीवर काम करत आहेत. मस्क यांच्याशी त्यांची दुश्मनी ही चर्चेत होती.

कुठे झाला जन्म ?

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोर यांचा जन्म 1986 साली मध्ये उझबेकिस्तान (तेव्हाचे सोव्हिएत युनियन) येथे झाला. गोर यांचे कुटुंब काही वर्षे माल्टामध्ये राहिले आणि त्यानंतर 1999 साली ते माल्टा सोडून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत गेले आणि लॉस अँजिलिसमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर ते जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात (वॉशिंग्टन डीसी) शिक्षणासाठी गेले. विद्यार्थीदशेपासूनच ते रिपब्लिकन राजकारणाशी संबंधित होते. त्यांनी स्टीव्ह किंग आणि मिशेल बॅचमन सारख्या कायदेकर्त्यांसाठी प्रवक्ता म्हणून काम केलं होतं. नंतर ते सिनेटर रँड पॉल यांचे कर्मचारी म्हणून काम करू लागले आणि डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ बनले.

रशियाशीही कनेक्शन 

गोर यांचे रशियाशीही संबंध आहेत अशी चर्चा आहे. खरंतर, 2018साली ते पॉलसोबत मॉस्कोला गेले होते. रशिया-अमेरिका संबंधांवर संशोधन आणि चर्चेसाठी त्यांनी हा दौरा केला होता, असं म्हटलं जातं. दरम्यान एका ली क झालेल्या रशियन रेकॉर्डमध्ये असेही म्हटले होतं की गोर यांनी त्याआधी, एक वर्षापूर्वीही मॉस्कोला भेट दिली होती.  पण ते मॉस्कोला का गेले याचा मात्र त्यात काहीच उल्लेख नाही.  त्यांच्या मॉस्को भेटीमागील कारणं काय होती हे अद्यापही एक गूढ आहे.

ट्रप यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच सोशल मीडियावर नवीन राजदूताची नियुक्ती जाहीर करणारी एक पोस्ट शेअर केली होती. ” सर्जियो गोर यांची भारतातील अमेरिकेचे पुढील राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती करत आहे, हे सांगताना मला आनंद होतोय.” असं त्यांनी नमूद केलं. सर्जियो यांची नियुक्ती निश्चित होईपर्यंत ते व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या सध्याच्या भूमिकेत काम करत राहतील, असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं होतं .