
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता वाटेल ते बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्याच्या वक्तव्यात किती खरेपणा आहे हा देखील प्रश्न आहे. आता त्यांनी केलेला आणखी एक दावा फोल ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ नीतिनंतर भारताबाबत केलेलं वक्तव्य खोटं निघालं आहे. भारताने जगातील सर्वाधिक टॅरिफ लादला आहे. तर अमेरिकेने भारतीय वस्तूंना कोणत्याही अडथळ्याशिवाया बाजारपेठेत प्रवेश दिला आहे. भारताच्या अतिरिक्त शुल्कामुळे हार्ले डेव्हिडसनसारख्या बाइक कंपन्यांना भारत सोडावा लागला. खरंच भारताच्या अतिरिक्त शुल्कामुळे असं घडलं आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा पुन्हा एकदा खोटा निघाला आहे. हार्ले डेव्हिडसनने भारतातून गाशा गुंडाळण्याचं कारण काही वेगळंच आहे. त्याचा टॅरिफशी काही एक संबंध नाही.
हार्ले डेव्हिडसन यांनी ऑगस्ट 2009 मध्ये भारतात पहिल्यांदा पाय टाकला. 2010 मध्ये पहिल्यांदा डीलरशिप सुरु केली. यावेळी ही कंपनी भारतात बाइक आयात करत होती. त्यानंतर काही मॉडेल्स देशात असेंबल करण्यास सुरुवात केली. पण दहा वर्षानंतर म्हणजेच 2020 मध्ये हार्ले डेव्हिडसनला भारत सोडावा लागला. भारतातील विक्री पूर्णपणे बंद केली. पण भारत सोडण्याचे कारण टॅरिफ नव्हते. तर त्याचं कारण काही वेगळंच आहे. सुरुवातीला कंपनीला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर विक्रीत घट होत गेली. त्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे हार्ले डेव्हिडसनने भारतातील उत्पादन बंद केले.
भारतीय बाजारात आधीच हिरो, बजाज आणि होंडासारख्या कंपनीने घट्ट पाय रोवले आहे. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणं हार्ले डेव्हिडसनला काही जमलं नाही. हार्ले डेव्हिडसनने 2011 मध्ये प्लांट सुरु केल्यानंतर वार्षिक विक्री 3000 युनिटपेक्षा कमी होती. भारतीय बाजारपेठेतील सर्वात कमी विक्री आहे. कारण या बाइकची सरासरी किंमत ही 5 ते 50 लाखांच्या घरात आहे. या बाइक भारतीय ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे मागणी कमी होती. असं असलं तरी हार्ले डेव्हिडसन भारतात परतली आहे. भारतातील विक्री आणि ऑपरेशन्स हीरो मोटोकॉर्पद्वारे हाताळली जात आहेत.हीरो मोटोकॉर्पसोबत कराराद्वारे भारतात पुन्हा विक्री सुरु केली आहे. कंपनीने भारतात परवडणारी हार्ले-डेव्हिडसन X440 देखील लाँच केली आहे.