भारताचे अमेरिकेतील ट्रम्प सरकारला पाच मोठे धक्के, टॅरिफ लावून कोंडी करण्याची रणनिती फसली!
अमेरिकेतील ट्रम्प सरकारने भारताची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. टॅरिफ लादून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला. पण भारताने अमेरिकेला तोडीस तोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे अमेरिकेची रणनिती फसताना दिसत आहे. भारताने एका आठवड्यातच अमेरिकेला पाच ठिकाणांहून उत्तर दिलं आहे.

रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो, ह कारण पुढे करत अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता. त्यात अमेरिकेतील नेते आणि तज्ज्ञ मंडळी भारतावर शब्दप्रहार देखील करत होते. त्यात भारताची मृत अर्थव्यवस्था असल्याची टीका केली होती. त्यामुळे भविष्यात भारताने एक पाऊल मागे घेतलं नाही तर नुकसान होईल, असं चित्र निर्माण केलं जात होतं. पण भारत अमेरिकेच्या या दबावापुढे काही झुकला नाही. रशियाकडून तेल आयात सुरुच ठेवली. उलट शत्रू राष्ट्र असलेल्या चीनसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्नही सुरु केला आहे. त्यामुळे अमेरिकेची चोहेबाजूने कोंडी होताना दिसत आहे. असं असताना मृत अर्थव्यवस्था म्हणणाऱ्यांना देखील चपराक दिली आहे. मागच्या आठवड्यात भारताच्या कृतीतून हे स्पष्ट झालं आहे. जीडीपी डाटा, जीएसटी कलेक्शन, ऑटो एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताची कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न फसला आहे.
जीडीपी डेटा अपेक्षेपेक्षा चांगला : चालु आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी अपेक्षेपेक्षा चांगला आहे. जीडीपी 7.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कृषी क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे जीडीपी सुधारला आहे. तर व्यापार, हॉटेल्स, वित्तीय आणि रियल इस्टेटसारख्या क्षेत्रातूनही मदत झाली आहे. चीनचा या तिमाहीत जीडीपी हा 5.2 टक्के होता. त्याची तुलना केल्यास भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचं दिसत आहे.
जीएसटी संकलनात वाढ : भारताने जीएसटी लागू केल्यापासून एकप्रकारची शिस्त लागली आहे. जीएसटी संकलनात यामुळे वाढ होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात जीएसटी 6.5 टक्क्यांनी वाढला असून 1.86 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण देशांतर्गत महसूल 9.6 टक्क्यांनी वाढून 1.37 लाख कोटी रुपये झाला. दुसरीकडे आयात कर 1.2 टक्क्यांनी कमी होऊन 49, 354 कोटी रुपये झाला. ऑगस्ट 2025 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल 1.67 लाख कोटी रुपये झाला. वार्षिक आधारावर 10.7 टक्के वाढ आहे.
उत्पादन क्षेत्रात भरीव कामगिरी : उत्पादन क्षेत्रात मागच्या 17 वर्षातील उच्चांक कामगिरी ऑगस्ट महिन्यात दिसून आली आहे. ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ जुलैमधील 59.1 वरून ऑगस्टमध्ये 59.3 वर पोहोचला. हे गेल्या साडेसात वर्षांतील ऑपरेटिंग परिस्थितीत सर्वात जलद सुधारणा दर्शवते. एचएसबीसीचे प्रमुख भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले की, उत्पादनात जलद वाढ झाल्यामुळे ऑगस्टमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्राने आणखी एक नवीन उच्चांक गाठला.
सेवा क्षेत्रानेही उमटवला ठसा : भारतील सेवा क्षेत्रातही भरीव कामगिरी झाल्याचं दिसून आलं आहे. सेवा क्षेत्राची कामगिरी गेल्या 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रातील व्यवसाय 60.5 टक्क्यांवरून 62.9 वर पोहोचला आहे. नव्या मागणीत वाढ झाल्याने हा फायदा झाल्याचं दिसून येत आहे.
ऑटोक्षेत्राची भरारी : ऑटोक्षेत्राने ऑगस्ट महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. या क्षेत्रात निर्यात वाढल्याचं दिसून आलं आहे. मारुती सुझुकीचा निर्यात ऑगस्टमध्ये 4.51 टक्क्यांना वाढून 36538 युनिट्सवर पोहोचलं आहे. रॉयल एनफिल्ड आणि महिन्द्रा कारच्या निर्याततही वाढ झाली आहे. अशोक लेलँडच्या निर्यातीतही वाढ झाली असून जवळजवळ 70 टक्क्यांनी वाढून 1617 युनिट्स झाली आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक बजाज ऑटोच्या निर्यातीत वाढ दिसून आली आहे.
